Britain Queen Elizabeth II died: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं आज वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. महाराणी एलिझाबेथ द्वितीय या सध्या स्कॉटलंडच्या Balmoral castle मध्ये वास्तव्यास होत्या. या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कुटुंबीयांकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. किंग व क्वीन कंसोर्ट रात्री बाल्मोरलमध्ये राहतील. ते उद्या लंडनमध्ये परततील.
महाराणी एलिझाबेथ द्वितीय या ब्रिटनच्या सर्वाधिक काळापर्यंत राज्य करणाऱ्या महाराणी होत्या. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म २१ एप्रिल १९२६ रोजी झाला. त्यांचा जन्म लंडनमध्ये ड्यूक जॉर्ज सहावे व राजमाता राणी एलिझाबेथ यांच्या घरी झाला. त्यांच्या वडिलांनी १९३६ मध्ये एडवर्ड आठवे यांच्या पदत्यागानंतर सूत्रे हाती घेतली होती. तेव्हा त्या राज्याच्या उत्तराधिकारी झाल्या. १९४७मध्ये त्यांचा विवाह राजकुमार फिलीप यांच्याशी झाला. ९ सप्टेंबर २०१५ रोजी त्यांनी त्यांच्या पणजी महाराणी व्हिक्टोरिया यांच्या सर्वांत जास्त शासनकाळाचा विक्रम मोडला व त्या ब्रिटनवर सर्वाधिक काळ शासन करणाऱ्या सम्राज्ञी झाल्या. १९५२ मध्ये राणीचा राज्याभिषेक झाला होता आणि त्यांच्या कार्यकाळात अनेक बदलही झाले.प्रकृती खालावली होतीमहाराणी एलिझाबेथ यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र चार्ल हे ब्रिटनचे राजे असतील. गुरूवारीच एलिझाबेथ द्वितीय यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय स्कॉटलंडला रवाना झाले होते. महाराणी या episodic mobility या आजारानं ग्रस्त होत्या अशी माहिती शाही कुटुंबाकडून देण्यात आली. त्यांना चालण्यात आणि उभं राहण्यातही त्रास होत होता. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना फेब्रुवारी महिन्यातच कोरोनाची लागणही झाली होती.पंतप्रधानांनी व्यक्त केलं दु:खमहाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीटही केलं आहे. महाराणी एलिझाबेथ यांना आमच्या वेळच्या दिग्गजांच्या रुपात स्मरणात ठेवलं जाईल. त्यांनी सार्वजनिक जीवनात सन्मान दाखवला. त्यांच्या निधनामुळे दु:ख झालं आहे आणि माझ्या संवेदना त्यांचे कुटुंब आणि ब्रिटनच्या जनतेसोबत आहेत, असे ते म्हणाले.