लंडन : गेल्या आठवड्यात इजिप्तमध्ये रशियाचे एक विमान गूढरीत्या कोसळून २२४ जण ठार झाले असतानाच एक ब्रिटिश विमानही आॅगस्टमध्ये इजिप्तमध्येच क्षेपणास्त्र हल्ल्यातून बचावल्याचे उघडकीस आले आहे. या विमानातही १८९ ब्रिटिश पर्यटक होते.इजिप्तमधील शर्म-अल-शेख येथे हे विमान २३ आॅगस्ट रोजी उतरत असताना ते क्षेपणास्त्र हल्ल्यातून बालंबाल बचावले. त्यावेळी हे विमान क्षेपणास्त्राच्या टप्प्यापासून अवघे ३०० मीटर दूर होते, असे ‘गार्डियन’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.थॉमसन एअरवेजच्या या विमानाने लंडनच्या स्टान्सटेड विमानतळावरून उड्डाण केले होते. शर्म-अल-शेख विमानतळाजवळ आले असताना ते क्षेपणास्त्रापासून ३०० ते १००० फूट अंतरावर आले होते. क्षेपणास्त्र दिसताच वैमानिकाने कसेबसे सुरक्षित उतरविले आणि प्रवाशांना काहीच सांगितले नाही.एअरलाईन्सच्या नियमानुसार या घटनेबाबत ब्रिटिश परिवहन विभागाला तात्काळ माहिती देण्यात आली. परिवहन विभागानेही अशी घटना घडल्याची कबुली दिली आहे. या घटनेनंतर तेथे जाणाऱ्या विमानांना २६ हजार फुटांच्या खाली परवानगी नाकारण्यात आली आहे, असे एका प्रवक्त्याने सांगितले. (वृत्तसंस्था)रशियन विमानावर मिळाले हल्ल्याचे संकेतइजिप्तमध्ये गेल्या आठवड्यात रशियन विमानाच्या ‘ब्लॅक बॉक्स’मधून विमानात बॉम्बस्फोट झाल्याचे संकेत मिळाले आहेत. माहीतगार सूत्रांनी ही माहिती दिली. विमानाने उड्डाण केल्यानंतर २४ मिनिटांच्या आत फ्लाईट डाटा आणि व्हाईस रेकॉर्डरने काम करणे बंद केले होते.इजिप्तमधील शर्म-अल-शेख येथून या विमानाने सेंट पीटस्बर्गसाठी उड्डाण केले होते. विमान सिनाई बेटावर कोसळून त्यातील सर्व २२४ जण ठार झाले होते. ही घटना ३१ आॅक्टोबर रोजी घडली होती.क्रेमलिनचे प्रवक्ते दमित्री पेस्कोव म्हणाले की, हल्ल्यामुळे हे विमान कोसळले, असा याचा अर्थ नाही. या घटनेचा तपास अजून सुरू आहे; मात्र बॉम्बस्फोट घडवूनच हे विमान पाडण्यात आले, हे ब्लॅक बॉक्स डाटावरून दिसून येते, असे तपासाशी निगडित सूत्रांनी सांगितले.‘इसिस’ने हे विमान पाडल्याचा दावा केला होता; मात्र इजिप्त आणि रशिया या दोघांनीही हा दावा फेटाळून लावला होता; पण या विमानावर ‘बाह्य हल्ला’ झाल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यानंतर रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी इजिप्तला जाणारी सर्व विमाने थांबविण्याचा आदेश दिला आहे. इजिप्तमधील पर्यटन उद्योग अगोदरच संघर्ष करीत असताना त्या देशाला जाणारी विमाने रद्द करण्याचा रशियाचा निर्णय इजिप्तला एक मोठा धक्काच मानला जात आहे.
ब्रिटिश विमानही बचावले
By admin | Published: November 08, 2015 2:11 AM