लंडन : ब्रिटिश एअरवेजचे पायलट संपावर गेल्याने कंपनीला दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. सोमवार आणि मंगळवारी वेतन करारावरून पायलट संपावर गेले आहेत. एअरलाईनच्या 100 वर्षांच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा संप आहे.
पायलटांच्या दोन दिवसीय संपामुळे जवळपास 2 लाख 80 हजार लोकांवर परिणाम होणार आहे. यामुळे जवळपास 704 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. न्यूयॉर्क, दिल्ली, हॉन्गकाँग आणि जोहान्सबर्गची सर्व उड्डाणे रद्द झाली आहेत. कंपनीने प्रवाशांना जर फ्लाईट रद्द झाली असेल तर विमानतळावर न जाण्याची सूचना केली आहे.
वेतन आणि भत्त्यांमध्ये कपात केल्याने पायलट आणि विमान कंपनीमध्ये वाद निर्माण झाला आहे. यामुळे ब्रिटिश एअरलाइन पायलट एसोसिएशनने 23 ऑगस्टलाच संपाची घोषणा केली होती. यामध्ये म्हटले होते की, 9, 10 सप्टेंबरला पायलट संपावर जातील. तसेच विमान कंपनी बेजबाबदार असल्याचा आरोपही केला होता.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने संप आणि उड्डाणे रद्द झाल्याने त्यांच्या नागरिकांना सूचना दिल्या आहेत.