जगात असे अनेक बॉडीबिल्डर आहेत की जे भारी वजन उचलून व्यायाम करणं पसंत करत असतात. ताकद आणि आणखी पीळदार शरीरयष्टी व्हावी यासाठी जास्तीत जास्त वजन उचलण्याची बॉडीबिल्डरची तयारी असते. पण मूळात तुमच्या शरीराची जितकी क्षमता आहे तितकंच वजन उचलणं अत्यंत महत्वाचं आहे. क्षमतेच्या पलिकडे जाऊन जीवघेणे प्रयत्न केले तर गंभीर दुखापतीला सामोरं जावं लागतं. २०२१ मध्ये एका ब्रिटीश बॉडीबिल्डरचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. यात तो तब्बल २२० किलो वजन उचलून व्यायाम करण्याचा प्रयत्न करत होता आणि यातच तोल गेल्यामुळे उजव्या बाजूनं छातीच्या हाडांना गंभीर दुखापत झाली होती. अंगावर काटा आणणाऱ्या या व्हिडिओनंतर सर्व बॉडीबिल्डर्समध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आता याच बॉडीबिल्डरचं रिकव्हरी प्रोसेसची माहिती देत प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती सर्वांना दिली आहे.
३० किलोचं वजन उचलून व्यायाम करत असतानाचा एक व्हिडिओ त्यानं पोस्ट केला आहे. तसंच दुखापतीवर कशी मात केली आणि त्याला कुणीकुणी साथ दिली याचीही माहिती त्यानं इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिली आहे.
रायन क्रॉली असं या बॉडीबिल्डरचं नाव आहे. रायनचा जन्म हॅम्पशायर येथे झाला. वयाच्या १६ व्या वर्षापासूनच त्याला बॉडीबिल्डींगची आवड निर्माण झाली. मार्च २०२१ मध्ये तो जिममध्ये २२० किलो वजनाचा बेंच प्रेस व्यायाम प्रकार करत होता. त्यावेळी त्याच्यासोबत भयानक दुर्घटना घडली. त्याचा व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला. छातीचं हाड थेट मांसपेशी फाडून बाहेर आल्याची भयंकर दुर्घटना रायनसोबत घडली होती.
छातीचे स्नायू फाटले गेले होते आणि त्यामुळे छातीच्या उजव्याबाजूला एक सिस्ट बनला होता. त्यामुळे प्रचंड वेदना होत होत्या. रियान अजूनही या अपघातातून पूर्णपणे बरा झालेला नाही. तो सध्या रिकव्हरी प्रोसेसमध्ये आहे. नुकतंच त्यानं ३० किलो वजनाचा डंबल प्रेस आणि बार्बेल प्रेस करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
जास्तीचं वजन उचलण्याची भीती वाटते"मी अजूनही पायांवर योग्य प्रकारे जोर देऊ शकत नाहीय. जसं मी थोडंसही वजन उचलण्याचा प्रयत्न करतो तर खाली पडेन अशी भीती वाटते. माझ्या शरीरासोबत पुन्हा तसंच काहीतरी घडेल याची मला भीती वाटते. माझ्या मनात भीतीनं घर केलं आहे. त्यामुळे मी मानसोपचारतज्ज्ञांच्याही संपर्कात आहे. मी अजूनही माझ्यासोबत घडलेली घटना विसरू शकलेलो नाही. ज्यावेळी माझ्यासोबत दुर्घटना घडली त्यानंतरही मी लगेच रुग्णालयात गेलो नव्हतो. पण वेदना सहन न झाल्यामुळे अखेर २५ तासांनी रुग्णालयात दाखल झालो होतो. आज डॉक्टरांनी माझ्यावर शस्त्रक्रिया करुन मला पुन्हा उभं करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. आता दुखापतच्या घटनेला १६ महिने झाले आहेत आणि मी रिकव्हरीच्या प्रोसेसमध्ये आहे", असं रायन यानं म्हटलं आहे.