लंडन: पंतप्रधान म्हणजे देशाचे प्रमुख. जनतेच्या किमान गरजा भागाव्यात, त्यांचं जीवनमान उंचवावं यासाठी धोरणं आखण्याची जबाबदारी पंतप्रधानांवर असते. देशातल्या जनतेचं उत्पन्न वाढावं, त्यांचं आयुष्य सुधारावं, यासाठी पंतप्रधान काम करत असतात. मात्र एखाद्या पंतप्रधानाला त्याला मिळणारं वेतनच पुरेसं पडत नसेल तर? ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन सध्या याच अडचणीचा सामना करत आहेत. पंतप्रधान म्हणून मिळणारं वेतन कमी असल्यानं पुढील सहा महिन्यात पद सोडण्याचा त्यांचा विचार आहे. ब्रिटिश वृत्तपत्रानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.बोरिस जॉन्सन यांना वर्षाकाठी १,५०,०४२ पाऊंड्स (जवळपास १.४३ कोटी रुपये) इतका पगार मिळतो. या वेतनात घरखर्च भागत नसल्याचं जॉन्सन यांना वाटतं. पंतप्रधान पदावरून दूर झाल्यास वृत्तपत्रात स्तंभलेखन करून यापेक्षा दुप्पट रक्कम मिळवू, असा जॉन्सन यांचा विचार आहे. सध्याच्या घडीला जॉन्सन कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आणि ब्रेक्झिटचा सामना करत आहेत. जॉन्सन पंतप्रधान होण्याआधी स्तंभलेखन करायचे. त्यातूनच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. स्तंभलेखनातून त्यांना मिळणारं उत्पन्नदेखील जास्त होतं. आता पंतप्रधान असल्यानं त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. मात्र उत्पन्न अतिशय कमी आहे. 'बोरिस जॉन्सन यांना सहा मुलं आहेत. यातील काही जण लहान आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक जबाबदारी जॉन्सन यांच्यावर आहे. जॉन्सन यांनी त्यांच्या पत्नीला घटस्फोट दिला. त्यानंतर तिला पोटगी म्हणून मोठी रक्कम द्यावी लागली. त्यांचा एक मुलगा शाळेत शिकतो. त्याचं शुल्कदेखील जॉन्सन यांना भरावं लागतं,' असं जॉन्सन यांच्या पक्षाच्या एका खासदारानं सांगितलं.बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्यास पुढील पंतप्रधान कोण होणार, याची चर्चा ब्रिटनमधील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पंतप्रधानपदासाठी अर्थमंत्री ऋषी सुनक, परराष्ट्र मंत्री डोमिनिक राब, माजी आरोग्य जेरेमी हंट, कॅबिनेट मंत्री मिशेल गोव यांची नावं आघाडीवर आहेत. यापैकी सुनक यांचं नाव आघाडीवर आहे. सुनक यांनी कोरोना संकट काळात आपल्या वेतनातून मदत केली होती.
घरखर्च कमी होईना, पगारात भागेना; ब्रिटनचे पंतप्रधान लवकरच देणार राजीनामा?
By कुणाल गवाणकर | Published: October 21, 2020 10:41 AM