इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांना बडतर्फ केले आहे. त्यांनी पोलिसांवर पॅलेस्टाईन समर्थक आंदोलकांप्रती अती उदार असल्याचा आरोप केला होता. यानंतर, पीएम सुनक यांनी जेम्स क्लेव्हर्ली (James Cleverly) यांना ब्रिटनचे नवे गृहमंत्री म्हणून नियुक्त केले आहे. याच बरोबर, माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून (David Cameron) यांचीही तब्बल सात वर्षांनंतर पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री झाली आहे. त्यांची परराष्ट्रमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते जेम्स क्लेव्हर्ली यांचे स्थान घेतील.सरकार म्हणते, ब्रेव्हरमन यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाचा एक भाग म्हणून आपले पद सोडले -सरकारचे म्हणणे आहे की, ब्रेव्हरमन यांनी सोमवारी मंत्रिमंडळ फेरबदलाचा एक भाग म्हणून आपले पद सोडले आहे. तर एपीच्या वृत्तानुसार, सुनक यांच्यावर ब्रेव्हरमन यांना काढून टाकण्यासंदर्भात दबाव वाढत होता. खरे तर, ब्रेव्हरमन यांनी इस्रायल-हमास संघर्ष सुरू झाल्यानंतर, लंडनमध्ये होणारी निदर्शने कठोरपणे न हाताळल्याचा आपोर मेट्रोपॉलिटन सिटी पोलिसांवर केला होता.
यासंदर्भात बोलताना ब्रेव्हरमन म्हणाल्या, पॅलेस्टाईन समर्थक जमावाकडून कायद्याचे उलंघन होत असतानाही लंडन पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत होते. एवढेच नाही, तर गाझामध्ये युद्धबंदीचे आवाहन करणारे निदर्शक द्वेष पसरवत आहेत, असेही त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्ष आणि त्यांच्या पक्षातील काही लोकही त्यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी करत होते.
ब्रेव्हरमन यांच्या लेखासंदर्भात बोलताना आपल्याला ब्रेव्हरमनवर संपूर्ण विस्वास असल्याचे डाउनिंग स्ट्रीटने म्हटले होते. मात्र, टाइम्सच्या ओपिनियन लेखातील तिचे भाष्य पीएम सुनक यांच्या संमतीशिवाय कसे प्रकाशित झाले? यासंदर्भात आम्ही तपास करत आहोत. याशिवाय, ओपिनियन लेखाचे पंतप्रधानांच्या विचाराशी सामन्य नाही, असे सुनक यांच्या एका प्रवक्त्याने म्हटले होते.