लंडन :इंग्लंडचेपंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपली दुसरी पत्नी मरीना व्हीलर यांच्यापासून घटस्फोट घेतला आहे. मरीना यांची आई भारतीय बंशाची होती. या घटस्फोटामुळे 55 वर्षीय जॉन्सन यांचा कॅरी सायमंड्स यांच्याशी लग्न करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सायमंड्स यांनी गेल्या 29 एप्रिलला लंडन येथे एका मुलाला जन्म दिला. सायमंड्सपासून झालेले जॉन्सन यांचे हे पहिलेच मूल आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षांमध्ये 40 लाख पाउंडमध्ये (जवळपास 37 कोटी रुपये) सहमती झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
जॉन्सन आणि मरीना यांचा वाद घटस्फोटाच्या रकमेवरून फेब्रुवारी महिन्यात लंडनच्या सेन्ट्रल फॅमिली कोर्टात पोहोचला होता. जॉन्सन आणि मरीना यांचे 1993 मध्ये लग्न झाले होते. मात्र, या दोघांमध्ये 2018 मध्ये भांडण झाले. त्यांची चार अपत्ये आहेत. मरीनापासून अलग झाल्यानंतर जॉन्सन यांनी सायमंड्स यांच्याशी असलेल्या आपल्या नात्याची पुष्टी केली होती. जॉन्सन यांचा पहिला विवाह 1987मध्ये एलेग्रा यांच्याशी झाला होता. या दोघांची भेट विद्यापीठात शिकत असताना झाली होती.
बोरिस जॉन्सन आणि त्यांची होणारी पत्नी कॅरी सायमंड्स यांनी त्यांच्या मुलाचे नाव आपापले आजोबा आणि दोन डॉक्टरांच्या नावावरून विल्फ्रेड लॉरी निकोलस, असे ठेवले आहे. असेही सांगितले जाते, की जॉन्सन कोरोनामुळे आजारी असताना याच दोन डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले होते. 32 वर्षीय सायमंड्सने त्यांच्या बाळाचे नाव आजोबा लॉरी, जॉन्सन यांचे आजोबा विल्फ्रेड आणि जॉन्सन यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर निक प्राइस आणि निक हार्ट यांच्या नावाने (निकोलस) ठेवले आहे.
27 मार्च रोजी जॉन्सन याांना कोरोना संक्रमण असल्याचे समोर आले होते. जॉन्सन यांनी स्वतःच यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली होती. तसेच त्यांच्या वाग्दत्त वधूलाही कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लक्षणे दिसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर जॉन्सन यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यात ते पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ते तिथूनच देशाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. मात्र, त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.