रशिया आणि युक्रेन यांच्यात जबरदस्त युद्ध सुरू असतानाच इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी अचानक पणे युक्रेनला भेट दिली. या भेटीत ते राष्ट्रपती झेलेंस्की यांच्यासोबत किवच्या रस्त्यांवरून फिरताना दिसले. जॉन्सन यांच्या भेटीचा व्हिडिओही युक्रेन सरकारने सोशल मीडियावर शेअर केला आहे. दोन मिनिटांहून अधिकच्या या व्हिडिओत हे दोन्ही नेते स्नायपर्स आणि इतर सुरक्षा व्यवस्थेत फिरताना दिसत आहेत. कीवच्या मुख्य क्रेशचॅटिक रस्त्यावरून मैदान स्क्वेअरकडे जाताना हे दोन्ही नेते रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना अभिवादन करतानाही दिसत आहेत.
या वेळी पंतप्रधान जॉन्सन यांना पाहून भावूक झालेल्या एका व्यक्तीने, "आम्हाला आपली गरज आहे," असे म्हटले. यावर जॉन्सनही त्या व्यक्तीला विश्वास देत, "आपल्याला भेटून आनंद झाला. आम्हाला आपल्याला मदत करण्याचे सौभाग्य लाभले आहे. आपल्याकडेही झेलेंस्की यांच्या रुपात एक चांगले राष्ट्रपती आहेत," असे म्हणाले.
रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या 24 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाले. त्यानंतर जी-7 नेत्याची युक्रेनला दिलेली ही पहिलीच भेट आहे. यावेळी पंतप्रधान जॉन्सन यांनी 120 सुसज्ज वाहने आणि नवी अँटी-शिप मिसाईल सिस्टिम देण्याचेही आश्वासन दिले आहे. याशिवाय, त्यांनी जागतिक बँकेच्या अतिरिक्त 500 दसलक्ष डॉलर एवढ्या कर्जाचीही पुष्टी केली आहे.
यावेळी जॉन्सन म्हणाले, युक्रेनने रशियन फौजेला कीवच्या दरातच धक्का देत सर्वात मोठे यश मिळवले आहे. याच वेळी त्यांनी झेलेंस्की यांच्या नेतृत्वाचे आणि शौर्याचेही कौतुक केले.