ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. २६ - ब्रिटीश राजकुमार प्रिन्स विलियमची पत्नी केट मिडलटनच्या टॉपलेस फोटो प्रकरणी फ्रान्समध्ये सहा जणांविरोधात खटला चालणार आहे. फ्रेंच सेलिब्रिटी मॅगझिन 'क्लोजर'मध्ये सन २०१२ मध्ये केटचा टॉपलेस फोटो छापण्यात आला होता. खासगी आयुष्यात अतिक्रमण केल्याच्या आरोपावरुन छायाचित्रकार, वार्ताहर आणि मिडिया प्रमुखासह सहाजणांना आरोपी बनवण्यात आले आहे.
२०१२ मध्ये प्रिन्स विलियम आणि त्याची पत्नी केट सुट्टया घालवण्यासाठी फ्रान्समध्ये आले होते. त्यावेळी ते ज्या ठिकाणी उतरले होते तिथे लॉंग लेन्सच्या कॅमे-यामधून केटची टॉपलेस छायाचित्र काढण्यात आली. केट गॅलरीमध्ये टॉपलेस उभी असल्याचे त्या छायाचित्रामध्ये दाखवण्यात आले होते.
क्लोजरमध्ये सर्वप्रथम ही छायाचित्रे प्रसिद्ध झाली. क्लोजरचे संपादक, दोन छायाचित्रकार, ला प्रोव्हेन्स या फ्रेंच दैनिकातील प्रतिनिधीला या फोटोंप्रकरणी आता न्यायालयात उत्तर द्यावे लागणार आहे. हे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर ब्रिटीश राजघराण्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या फोटोंमध्ये आपल्या छायाचित्रकाराचा सहभाग असल्याचा आरोप ला प्रोव्हेन्सच्या संचालकांनी फेटाळून लावला आहे.
क्लोजरनंतर हा फोटो युरोपमध्ये सर्वत्र प्रसिद्ध झाला. रॉयल कपलने या फोटोवरुन तक्रार दाखल केली होती. या फोटोंवरुन मिडिया खासगी आयुष्यांमध्ये अतिक्रमण करत असल्याची डिबेट पुन्हा सुरु झाली होती. अशाच छायाचित्रकारांपासून पळताना १९९७ साली प्रिन्स विलियमची आई डायनचा पॅरिसमध्येच रस्ते अपघातात मृत्यू झाला होता.