जगभरातील सर्वच देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या तसेच हजारो लोक बेरोजगार झाले. मात्र अशी एक कंपनी आहे जी कोरोनाच्या संकटात काम करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांवर भलतीच खूश झाली आहे. कोरोना काळात कंपनीसाठी काम केल्याबद्दल खास भेट देत आहे. भेट म्हणून ही कंपनी सर्व कर्मचाऱ्यांना चार दिवसांच्या कॉर्पोरेट सुट्टीवर घेऊन जात आहे.
कार्डिफ स्थित योल्क रिक्रूटमेंट या कंपनीने जाहीर केले आहे की कंपनीच्या सर्व 55 कर्मचाऱ्यांना स्पेनच्या कॅनरी बेटांमधील सर्वात मोठ्या टेनेरीफ येथे सुट्टीसाठी घेऊन जाणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा पेड फॉर हॉलिडे असणार असून टेनेरिफ येखील एका हॉटेलमध्ये चार दिवस सुट्टीचा आनंद कर्मचाऱ्यांना घेता येणार आहे. योल्क कंपनीने लिंक्डइनवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे, "योल्क फोक टेनेरीफसाठी रवाना झाले आहे. तिथे फक्त शीर्ष बिलर्स किंवा आमच्या 2021 च्या ऐतिहासिक निकालांमध्ये ज्यांनी भूमिका बजावली तेच नाही तर इतर सर्वजण आहेत."
आपल्या कर्मचाऱ्यांना अशाप्रकारची सुट्टी देणारी योल्क रिक्रुटमेंट ही कार्डिफ स्थित पहिली कंपनी असू शकते, असे या कंपनीने म्हटले आहे. प्रत्येकजण जिंकेल अशी संस्कृती निर्माण करणे कंपनीचे उद्दिष्ट आहे. याचाच अर्थ असा की सर्वसमावेश कॉर्पोरेटेड सुट्टीच्या वेळी कोणीही मागे राहू शकत नाही. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, या सुट्टीच्या चार दिवसांच्या विश्रांतीसाठी 100,000 पाउंड म्हणजेच अंदाजे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येईल असा कंपनीचा अंदाज आहे.
योल्कचे मुख्य व्यावसायिक अधिकारी पवन अरोरा यांनी "2020 हे वर्ष आमच्या संपूर्ण उद्योगासाठी अत्यंत कठीण काळ होता. आम्ही जॉब मार्केट मधून ओव्हरड्राइव्हमध्ये गेलो. आमचे कर्मचारी वर्क फ्रॉम होम ते हायब्रीड असा प्रवास करत आहेत. म्हणूनच मागील दोन वर्षांसाठी आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना मनापासून धन्यवाद म्हणायचे आहे." असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.