फोर्टेलिझा (ब्राझील) : जगाच्या अर्थकारणाला कलाटणी आणि डॉलरच्या आर्थिक साम्राज्यवादाला आव्हान देऊ पाहणाऱ्या प्रस्तावित ब्रिक्स डेव्हलपमेंट बँकेत कोणत्याही एका समभागधारकाचे वर्चस्व असू नये यासाठी सर्व पाच सदस्य राष्ट्रांना समान भागीदारी देण्यावर भारत ब्रिक्स परिषदेत जोर देणार आहे. ब्रिक्स डेव्हलपमेंट बँकेत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या सर्व सदस्य देशांकडे समान समभाग असावेत हे भारताचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सूत्रांनी सांगितले. ब्रिक्स डेव्हलपमेंट बँकेची कल्पना सर्वप्रथम २०१२ मध्ये भारतात मांडण्यात आली, तर गेल्यावर्षी डरबन येथे या कल्पनेला मंजुरी देण्यात आली होती. ५० अब्ज डॉलरच्या प्रारंभिक भांडवलावर ही बँक सुरू करण्यात येणार असून तिचे भागभांडवल १०० अब्ज डॉलरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला होता. बँकेच्या गंगाजळीत चीन ४१ अब्ज, द. आफ्रिका ५, भारत, ब्राझील, रशिया प्रत्येकी १८ अब्ज डॉलर ओततील आणि पुढील पाच वर्षांत ४.५ ट्रिलियन डॉलर्स उभे करतील असे ठरले होते. पण आता मोदी आधीच्या भूमिकेला छेद देतील असे दिसते. ब्राझीलमध्ये होत असलेल्या या परिषदेत मोदी पुतीन, शी, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा आणि यजमान देश ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष दिल्मा रोसैफ यांच्यासोबत प्रस्तावित बँकेसह आंतरराष्ट्रीय वित्तीय रचना तसेच इतर मुद्यांवर सल्लामसलत करणार आहेत. भांडवलाच्या असमानतेमुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि आशियन डेव्हलपमेंट बँकेत अमेरिका आणि जपानचे वर्चस्व आहे. हा कित्ता ब्रिक्स डेव्हलपमेंट बँकेत गिरवला जाऊ नये, यासाठी भारत समान समभागाच्या मुद्यावर जोर देणार आहे. (वृत्तसंस्था)
ब्रिक्स बँकेत समान भागीदारीवर जोर देणार
By admin | Published: July 15, 2014 1:52 AM