अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ब्रूकलिनमध्ये रेल्वे स्थानकावर मोठा हल्ला झाला आहे. अनेक लोकांवर गोळीबार करण्यात आला आहे. अग्निशमन विभागाने याबाबत माहिती दिली आहे. स्टेशनमधील फरशीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रवाशांची काही लोक काळजी घेतानाचे फोटो समोर आले आहेत.
ब्रूकलिन स्थानकावर गोळीबारासह स्फोटांचे आवाजही ऐकू आल्याचे सांगितले जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कमीतकमी पाच लोकांवर एका व्यक्तीने गोळ्या झाडल्या आहेत. या व्यक्तीने गॅस मास्क आणि एक नारिंगी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तो घटनास्थळावरून फरार झाला असून अद्याप ताब्यात आलेला नाही.
मंगळवारी सकाळी 8:30 वाजता सनसेट पार्कमध्ये शूटरने आग लावण्याआधी काहीतरी स्फोटक फेकले असावे असे सूत्रांनी सांगितले. या हल्ल्यात किती जखमी किंवा मृत्यू झालेत ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.