देशावर सर्वाधिक काळ राज्य करणारे ब्रुनोईचे सुल्तान हसनल बोलकियाह यांचा मुलगा प्रिंस अब्दुल मतीन हे आज लग्न करणार आहेत. ३२ वर्षीय राजपुत्र अब्दुल मतीन हे २९ वर्षीय यांग मुलिया अनीशा रोस्ना हिच्यासोबत विवाहबद्ध होणार आहेत. हा लग्नसोहळा सेरी बेगवानमध्ये सोन्याचा घुमट असलेल्या मशिदीत आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा इस्लामिक पद्धतीने होणार आहे. तसेच या विवाहसोहळ्यानिमित्त ब्रुनोईमध्ये १० दिवसीय भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
युवराज मतीन हे जगातील दीर्घकाळ राज्य करणारे राजे असलेल्या सुल्तान हसनल बोकलिया यांचे दहावे पुत्र आहेत. त्यामुळे ब्रुनोईचे राजे बनण्याच्या क्रमवारीत ते खूप मागे आहेत. त्यामुळे ते सुल्तान बनण्याची शक्यता फारच कमी आहे. तर प्रिंस मतीन यांची होणारी पत्नी ही कथितपणे फॅशन आणि टुरिझम व्यवसायाची मालकीण आहे. यांग मुलिया अनीषा रोस्ना हिचे आजोबा हे युवराज मतीन यांचे वडील म्हणजेच ब्रुनोईच्या विद्यमान सुल्तानांचे प्रमुख सल्लागार राहिले आहेत.
युवराज मतीन हे ब्रुनोईमधील हेलिकॉप्टर पायलट आहेत. तसेच प्रसारमाध्यमांमधून त्यांची तुलना ही ब्रिटनचे प्रिंस हॅरी यांच्याशी केली जाते. आधी त्यांना हॉट रॉयल म्हटलं जात असे. सोशल मीडियावर त्यांचा जबरदस्त चाहतावर्ग आहे. तसेच ते त्यांच्या लूकमुळे अधिकच प्रसिद्ध झालेले आहेत.
शाही विवाहसोहळ्याच्या आनंदोत्सवासाठी १७८८ खोल्या असलेल्या महालामध्ये एक शानदार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. विवाहानंतर रविवारी एक मोठी मिरवणूक निघणार आहे. या शाही विवाहसोहळ्यामध्ये शाही पाहुणे आणि दिग्गज नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.