मनिला: देशाच्या संपत्तीची अलोट लूट करण्याखेरीज लाखो देशवासियांचा अनन्वित छळ केल्याने ‘क्रूरकर्मा’ ठरलेले फिलिपीन्सचे हुकूमशहा फर्निनांड मार्कोस यांचे मनिलाच्या दक्षिणेस असलेल्या राष्ट्रनेत्यांच्या दफनभूमीत दफन करण्यास त्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी हिरवा कंदील दाखविला.मार्कोस यांचा दफनविधी हा फिलिपीन्समध्ये संवेदनशील विषय ठरला होता. देशवासीयांमध्ये त्यावरून उभी फूट पडली होती. न्यायालयाच्या निकालाने या वादावर पडदा पडेल, अशी अपेक्षा आहे. मार्कोस यांचे चिरंजीव फर्निनांड मार्कोस ज्यु. यांनी ‘मोठ्या मनाने दिलेला निकाल’ अशा शब्दांत या निकालाचे स्वागत केले सार्वत्रिक निवडणुकीत भरघोस बहुमताने राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या रॉड्रिगो दुतेर्ते यांनी मार्कोस यांचे सन्मानाने दफन करण्याचे आश्वासन प्रचारात दिले होते. त्यानुसार, त्यांनी मार्कोस यांचे दफन ‘हीरोज सेमिट्री’मध्ये करण्याचा आदेश गेल्या आॅगस्टमध्ये दिला होता. मार्कोस यांच्या सत्ताकाळात छळ झालेल्यांनी या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ९ विरुद्ध ५ अशा बहुमताने त्या फेटाळून लावताना व राष्ट्राध्यक्षांना हा अधिकार असल्याचे जाहीर केले.राष्ट्राध्यक्ष दुतेर्ते यांच्या वतीने निकालाचे स्वागत करताना अध्यक्षीय प्रवक्ते अर्नेस्टर अॅबेल्ला यांनी म्हटले की, यामुळे हा वादविषय कायमचा संपुष्टात येऊन देश शांततेच्या व सर्वांसाठी न्याय्य अशा विकासाच्या मार्गावर मार्गस्थ होऊ शकेल, अशी आशा आहे. शंभराहून अधिक मार्कोस समर्थकांनी हातात फिलिपीन्सचा राष्ट्रध्वज घेऊन व मार्कोस यांचे चित्र असलेला टी-शर्ट अंगात घालून निकाल जाहीर होताच न्यायालयाबाहेर जल्लोश केला, परंतु विरोधकांची प्रतिक्रियाही तेवढीच तीव्र होती. डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांच्या ‘बयान’ (राष्ट्र) या संघटनेचे महासचिव रेनॅटो रेयेस म्हणाले, ‘आजचा दिवस केवळ वाईटच नाही, तर मार्कोस यांच्या हुकुमशाही वरवंट्याने भरडले गेलेल्यांसाठी व ज्या पिढ्यांनी अत्यंत निर्दयी अशा फॅसिस्ट राजवटीच्या झळा सोसल्या, त्यांच्यासाठी आक्रोशाचा आहे. भावी पिढ्यांच्या नशिबी कधीही असा काळाकुट्ट कालखंड येऊ नये यासाठी आम्ही आमचा लढा सुरूच ठेवू. (वृत्तसंस्था)
क्रूरकर्मा मार्कोसचे ‘हीरो’ म्हणून होणार दफन
By admin | Published: November 09, 2016 6:21 AM