प्रजासत्ताक दिनापूर्वी भारत-बांगलादेश सीमेवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. भारत आणि बांगलादेशमध्ये ४,०९६ किमी एवढी लांब सीमा आहे. या सीमेवर घुसखोरी केली जाते. पाकिस्तानसारखीच ही सीमा देखील कुंपण घालून सुरक्षित केली जाणार आहे. यासाठी ऑपरेशन अलर्ट सुरु करण्यात आले आहे.
बांगलादेशसोबतची बदलती परिस्थिती पाहून सीमा सुरक्षा दलाने हा निर्णय घेतला आहे. सुरक्षा वाढवण्यासाठी ४,०९६ किमी लांबीच्या भारत-बांगलादेश सीमेवरील सर्व फील्ड फॉर्मेशनमध्ये 'ऑप्स अलर्ट' सुरू करण्यात आला आहे, असे बीएसएफने म्हटले आहे.
अतिरिक्त महासंचालक (एडीजी) रवी गांधी यांनी ऑपरेशनल तयारीचा आढावा घेण्यासाठी दक्षिण बंगाल फ्रंटियरचा दौरा केला आहे. दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी सीमा गस्त आणि इतर देखरेख वाढविली जाईल. बीएसएफचे जवान सीमेवर तैनात केले जाणार आहेत. जेणेकरून घुसखोरी किंवा दहशतवादी कायवाया रोखल्या जातील.
नुकताच पाकिस्तानच्या प्रमुख लष्करी संस्थांच्या अधिकाऱ्यांनी बांगलादेशच्या सीमेवर दौरा केला होता. हा भाग भारतासाठी खूप महत्वाचा आहे. भारताचा चिकन नेक भाग हा उर्वरित सेव्हन सिस्टर राज्यांना देशाशी जोडतो. या भागात पाकिस्तानी अधिकाऱ्यांना घेऊन बांगलादेशी अधिकारी गेल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या राज्यांवर चीनचा डोळा आहे. यामुळे हे तीन देश मिळून भारताविरोधात कारस्थाने रचण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी नुकताच प्रसिद्ध सिलिगुडी कॉरिडॉरला लागून असलेल्या रंगपूरचा दौरा केला आहे. याच पाकिस्तानी सैन्याने काही दशकांपूर्वी बांगलादेशी नागरिक, महिलांवर अत्याचार केले होते. त्याच पाकिस्तानला हा भारतद्वेष्टा बनलेला बांगलादेश भारताविरोधात कारवाया करण्यासाठी मदत करू लागला आहे. भारताचा हा अत्यंत निमुळता भाग असून पलीकडच्या बाजुला नेपाळ, भूतान आणि या बाजुला बांगलादेश अशी भौगोलिक रचना आहे.