कुपवाडा: जम्मू-काश्मीरलगतच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानची संरक्षण सिद्धता मजबूत होण्यासाठी चीन तीन वर्षांपासून पाकला लष्करी मदत करत आहे. त्यात पाकच्या हद्दीत बंकर बांधणे, कम्युनिकेशन टॉवर, रडार यंत्रणा उभारणे, आदी गोष्टींचा समावेश असल्याची माहिती बुधवारी सूत्रांनी दिली.
पाक लष्कर व हवाई दलाला टेहळणी व गुप्तचर यंत्रणेच्या दृष्टीने चीन मदत करत आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या (सीपीईसी) अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनने केलेल्या गुंतवणुकीला कोणताही धोका पोहोचू नये यासाठी चीनने जम्मू-काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानला लष्करी साहाय्य केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.नियंत्रण रेषेवर पाकच्या हद्दीतील चौक्यांवर २०१४ पासूनच चिनी लष्करी अधिकाऱ्यांचेही अस्तित्व आढळून आले होते. चिनी लष्कर व इंजिनिअर पाकिस्तानच्या हद्दीत त्या देशासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्याचे काम करत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
अशा केल्या चीनने पाकिस्तानात हालचाली
- २००७ साली चीनच्या दूरसंचार कंपनीने पाकिस्तानी दूरसंचार कंपनी विकत घेऊन चायना मोबाइल पाकिस्तान (सीएमपीएके) ही कंपनी स्थापन केली. चायना मोबाइल कम्युनिकेशन कॉर्पोरेशनची ही सबसिडी कंपनी होती.
- ऑगस्ट २०२२ मध्ये पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाने सीएमपीएके या कंपनीच्या पाकव्याप्त काश्मीर या भागासाठीच्या परवान्याचे नूतनीकरण केले. पाकिस्तानच्या हद्दीत चीनच्या सुरू असलेल्या हालचालींवर भारतीय लष्कराचे बारीक लक्ष आहे.