ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि.30 - उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी तळांवर हल्ला केला. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानाने यासंबंधी आता पुरावे नष्ट करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
भारतीय जवानांनी ज्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्यांचे सर्वांचे मृतदेह पुरण्याचे काम पाकिस्तानमध्ये सुरू आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून ही माहिती समोर आली आहे. तसंच लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर या दोघांना शांत राहण्याचे आदेशदेखील दिले आहेत.
आणखी बातम्या :
उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची विविध मार्गांनी कोंडी केल्यानंतर भारताने बुधवारी मध्यरात्री जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला. हेलिकॉप्टरच्या मदतीने लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे सात लाँच पॅड उद्ध्वस्त केले. त्यात पाकिस्तानचे 9 सैनिकही ठार झाल्याचे सांगण्यात येत असले तरी पाकिस्तानने दोनच सैनिक मारले गेल्याचे म्हटले आहे.