पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो (Burkina Faso) देशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील दोन गावांवर काही अज्ञात हल्लेखोरांनी गुरुवारी (6 एप्रिल) रात्री हल्ला केला. यात तब्बल 44 जणांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात रॉयटर्स या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. तसेच, बुर्किना फासोच्या साहेल भागातील कौराकोउ (Kourakou) आणि तोंडोबी (Tondobi) या गावांमध्ये हे हल्ले झाल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
या भागावर अल कायदा आणि इस्लामिक स्टेटशी संबंधित इस्लामिक संघटनांचा कब्जा आहे. यापूर्वीही या भागात अनेक वेळा हल्ले झाले आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, गुरुवारी झालेले हे हल्ले कोणत्या संघटनेने केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अधिकाऱ्यांनी यासाठी सशस्त्र दहशतवादी गटांना जबाबदार धरले आहे.
हिंसाचारामुळे 20 लाखहून अधिक लोक विस्थापित -माध्यमांतील वृत्तांनुसार, जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक असलेल्या बुर्किना फासोमध्ये गेल्या काही वर्षांत हजारो लोक हिंसाचाराचे बळी ठरले आहेत. तर 20 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. अशांततेमुळे गेल्या वर्षात देशाला दोन लष्कराकडून झालेल्या तख्तापालटाचा सामना करावा लागला. तरीही अद्याप हिंसाचाराच्या घटना थांबलेल्या नाहीत. पश्चिम आफ्रिकेतील माली या देशापासून 2012 मध्ये अशांततेची सुरुवात झाली. यानंतर हिंसाचार शेजारील बुर्किना फासो आणि नायजरमध्येही पसरला आहे.