औगादोगू : बुर्किनाफासो या आफ्रिकी देशातील राजधानीत असलेल्या दोन मोठ्या हॉटेल्समध्ये घुसून अल काईदाशी निगडित अतिरेक्यांनी अनेक नागरिकांना ओलिस ठेवले. त्यामुळे सुरक्षा फौजांनी कित्येक तास केलेल्या कारवाईत चार अतिरेकी आणि अन्य २३ जण ठार झाले. या हॉटेलमधील सर्व १२६ ओलिसांची सुटका करण्यात आली. औगादोगू या राजधानीच्या शहरात चार तारांकित स्प्लेंडिड आणि या हॉटेलच्या जवळच कॅप्युचिनो हे दुसरे हॉटेल आहे. या दोन्ही हॉटेलमध्ये प्रामुख्याने संयुक्त राष्ट्रांचे कर्मचारी आणि विदेशी नागरिक वास्तव्यास असतात. याच हॉटेलांवर अल-काईदाशी निगडित जिहादींनी हल्ला केला. त्यात जिहादींच्या गोळीबारात २३ जण ठार झाले. हे सर्व १८ देशांतील नागरिक आहेत. ठार झालेल्या चार अतिरेक्यांत दोन महिलांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. पाचवा हल्लेखोर पळून गेला.तत्पूर्वी १४७ खोल्या असलेल्या या हॉटेलच्या प्रमुख दरवाजाजवळच मोठी आग लागली होती आणि हॉटेलमधील लोकांची आरडाओरड बाहेर ऐकू येत होती. हॉटेलबाहेर असलेल्या १० वाहनांनाही आग लागली होती. या भीषण आपत्तीतून बचावलेला यानिक स्वॅदेगो हा ओलिस म्हणाला की, हॉटेलमधील चित्र भयंकर होते. गोळीबार सुरू होताच लोक जमिनीवर खाली झोपत होते आणि सर्वत्र रक्त दिसत होते. हल्लेखोर अगदी जवळून गोळीबार करीत होते. जे लोक जिवंत आहेत, त्यांना ठार मारण्याचा आदेश हल्लेखोर देत होते आणि पुन्हा गोळीबार करीत होते. दोन महिन्यांपूर्वी मालीतील रॅडिसन ब्लू या हॉटेलवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात १४ विदेशी नागरिकांसह २० जण ठार झाले होते. त्यानंतर ही घटना घडली आहे. त्या हल्ल्याची जबाबदारी अल काईदाने स्वीकारली होती. आता या हल्ल्यामागेही अल काईदाशी निगडित गटाचाच हात असल्याचा संशय आहे.गेल्या महिन्यातच रॉक मार्क कॅबोर यांनी या देशाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यांनी घटनास्थळाचा दौरा करून पाहणी केली, पण कोणतेही भाष्य केले नाही. अलीकडील काही महिन्यांत या देशात अनेक हल्ले झाले आहेत; पण अशा प्रकारचा हा पहिलाच हल्ला आहे.या भागात असलेल्या दहशतवाद्यांविरुद्धच्या लढाईत जी-५ देशात बुर्किनाफासो हा एक देश सामील झाला आहे. (वृत्तसंस्था)३३ जखमी मृतांची संख्या वाढण्याची भीती- बुर्किनाफासोच्या सैनिकांना फ्रान्सच्या विशेष फौजांनी कारवाईत साह्य केले. स्प्लेंडिड हॉटेलमधील मुक्त करण्यात आलेल्या १२६ नागरिकांपैकी ३३ जण जखमी झाले आहेत. - स्प्लेंडिड आणि कॅप्युसिनो या हॉटेलवरील कारवाई समाप्त झाली असली तरी शेजारच्याच हॉटेल येबी येथे झडती सुरूच आहे, असे गृहमंत्री सायमन कॉम्पेअर यांनी सांगितले. - ठार झालेल्या हल्लेखोरात एक अरब आणि दोन कृष्णवर्णीय आफ्रिकी नागरिकांचा समावेश आहे. आतापर्यंत २३ जण ठार झाले असले तरीही मृतांची संख्या वाढू शकते. - ओलिसांत देशाचे कामगारमंत्री क्लेमेंट स्वॅदोगो यांचा समावेश होता, तेही सुखरूप आहेत. या कारवाईत २७ जण ठार झाल्याचे फ्रेंच सूत्रांनी सांगितले.