काठमांडू- गुजरातहून नेपाळला गेलेल्या भारतीय यात्रेकरूंची बस डोंगराळ भागातील रस्त्यावरून प्रवास करत असताना १०० मीटर खोल खड्ड्यात पडली असून, या अपघातात ९ महिलांसह १७ भारतीय यात्रेकरू ठार झाले आहेत, तर २८जण जखमी झाले आहेत. या दुर्दैवी बसवर भारतीय नंबर प्लेट आहे. अपघात झाला तेव्हा बसमध्ये ४५ प्रवासी होते. काठमांडूपासून ७५ कि.मी. अंतरावर धाडिंग जिल्ह्यातील नौबिस गावाजळ पृथ्वी महामार्गावर हा अपघात झाला. गुजरातमधील यात्रेकरू काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिर पाहिल्यानंतर भारतातील गोरखपूर येथे परतत होते, असे पोलीस अधीक्षक बिश्वराज पोखरेल यांनी सांगितले. मृतांपैकी १४ यात्रेकरूअपघातस्थळीच मरण पावले, तर तिघांनी जवळच असलेल्या रुग्णालयात उपचार सुरू असताना प्राण सोडला. मरण पावलेल्या यात्रेकरूंत नऊ महिला व आठ पुरुष आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी काठमांडू येथे नेण्यात आले आहे. त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे. भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार २१ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेपाळमधील भारतीय दूतावासाने अपघातस्थळी एक पथक नियुक्त केले असून मदतकार्यात समन्वय ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे दूतावासातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. या दुर्दैवी अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, कारण बस खड्ड्यात पडली होती व काही प्रवासी बसखाली दबलेले असण्याची शक्यता आहे, असे पोखरेल यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सांत्वन नेपाळमधील बस अपघातात मरण पावलेल्या भारतीय यात्रेकरुंच्या कुटुंबियांचे सांत्वन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. टिष्ट्वटरवर मोदी यांनी हा संदेश दिला आहे.
नेपाळमध्ये बस अपघात; १७ भारतीय भाविक ठार
By admin | Published: April 23, 2015 1:28 AM