वॉशिंग्टनः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. त्यामुळे भारतही कोरोनाविरोधातील लढ्यात सक्रिय आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात अमेरिकेनं भारताला पुन्हा एकदा मदतीचा हात दिला आहे. अमेरिकेनं भारताला 59 लाख डॉलरची आरोग्य मदत दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, अमेरिकेनं दिलेला निधी कोरोनाग्रस्तांची देखभाल, समाजाला आवश्यक आरोग्यसेवा पुरवणं आणि कोरोना विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी वापरला जाणार आहे. या निधीचा उपयोग आपत्कालीन तयारी आणि जागतिक महारोगराईशी दोन हात करण्यासाठी केला जाणार आहे. अमेरिकेकडून 20 वर्षांपासून भारताला मदत देण्यात येत असून, जवळपास 2.8 अब्ज डॉलरच्या एकूण सहाय्यतेचा हा निधी एक भाग आहे. त्यामध्येच 1.4 अब्ज डॉलरच्या आरोग्य मदतीचाही समावेश आहे. दक्षिण आशियातील अनेक देशांना अमेरिकेनं कोरोनाला थोपवण्यासाठी मदत निधी दिलेला आहे. ज्यात अफगाणिस्तान (1.8 कोटी डॉलर), बांगलादेश (96 लाख डॉलर), भूतान (पाच लाख डॉलर), नेपाळ (18 लाख डॉलर), पाकिस्तान (94 लाख डॉलर) आणि श्रीलंका (13 लाख डॉलर) या देशांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अमेरिकेने फेब्रुवारी महिन्यात भारताला जाहीर केलेल्या 10 कोटी डॉलर्सच्या व्यतिरिक्त ही मदत दिली आहे. सध्या जाहीर केलेली नवीन रक्कम रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रे (सीडीसी) यासह विविध विभाग आणि एजन्सींच्या सहाय्यतेसाठी देण्यात येणार आहे. ही आर्थिक मदत जागतिक महामारीचा धोका असलेल्या 64 सर्वाधिक जोखमीच्या देशांसाठी आहे.
CoronaVirus: मैत्रीला जागला! अमेरिकेनं कोरोनाच्या लढ्यासाठी भारताला दिली 59 लाख डॉलरची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 11:54 AM