नवी दिल्ली : हवेत उडणारे फुगे दिसायला चांगले वाटतात; पण हेच फुगे संकट बनले तर? सप्टेंबर १९८६ मध्ये अमेरिकेच्या क्लिव्हलँड शहरात काहीसे असेच झाले होते. जागतिक विक्रम बनविणे आणि सामाजिक कार्यासाठी निधी गोळा करणे या उद्देशाने आकाशात एकाच वेळी १५ लाख फुगे सोडण्यात आले होते; पण निसर्गाला काही तरी दुसरेच मंजूर होते.फुगे आकाशात सोडले तेव्हा सगळे सुरळीत होते; पण अचानक वादळाला सुरुवात झाली. वादळामुळे फुगे आकाशात उडण्याऐवजी पुन्हा जमिनीवर आणि पाण्यात पडू लागले. त्यामुळे एरी सरोवरात बुडणाऱ्या दोन लोकांना पोलिसांचे हेलिकॉप्टर शोधू शकले नाही. आयोजक संस्था युनायटेड वे आॅफ क्लिव्हलँडला अनेक खटल्यांचा सामना करावा लागला. या संस्थेने शहरातील मुख्य चौकात मोठा फलाट उभारला होता. नंतर तो नेटने झाकून टाकला. २,५00 स्वयंसेवकांनी प्रचंड मेहनतीने फुग्यांत हवा भरली. संस्था २0 लाख फुगे आकाशात सोडणार होती. तथापि, खराब हवामानामुळे ही संख्या १५ लाख करण्यात आली. फुग्यांत हवा भरल्यानंतर नेट उघडण्यात आली. सगळे फुगे आकाशात उडाले. सुंदर दृश्य होते. लोक टाळ्या वाजवत होते. त्याच वेळी अचानक वादळाला सुरुवात झाली. हवा थंड झाल्यामुळे सगळे फुगे खाली आले. संपूर्ण शहर फुग्यांनी भरून गेले. विमानतळाची एक धावपट्टी जाम झाली. एरी सरोवर फुग्यांनी भरले. नेमके यावेळी सरोवरात पोलिसांचे एक हेलिकॉप्टर बेपत्ता मच्छीमारांना शोधत होते. सरोवर अचानक फुग्यांनी भरल्यामुळे बचावकार्य ठप्प झाले. दोन मच्छीमारांना वाचविता आले नाही. मच्छीमारांच्या परिवारांनी युनायटेड वे आॅफ क्लिव्हलँडवर खटला भरला. या घटनेने अमेरिकी प्रशासनाने धडा घेतला. अशा आयोजनांत सर्व पैलूंचा गंभीरपणे विचार होऊनच परवानगी दिली जाऊ लागली.
फुग्यांनी आणले होते अमेरिकी शहरावर संकट
By admin | Published: May 07, 2017 12:55 AM