तैपेई : सिंड्रेलाच्या हरवलेल्या बुटाची कथा आपण ऐकलेलीच आहे. अगदी तिच्या बुटाच्या आकारासारखेच तब्बल ५५ फूट उंचीचे महिलांसाठी खास आकर्षण निर्माण करणारे चर्च तैवानमध्ये तयार होत आहे. काचेचे पॅनेल्स हे तिचे वैशिष्ट्य असून प्रामुख्याने लग्नापूर्वीच्या फोटो शूटसाठी व लग्नासाठी ही वास्तू उभारण्यात येत असल्याचे तिच्या निर्माणकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. या चर्चसाठी ३२० काचेचे निळ्या रंगाचे पॅनेल वापरण्यात आले असून, वास्तूची रुंदी ३६ फूट आहे. तिच्या उभारणीवर ६ लाख ८६ हजार अमेरिकन डॉलर्स इतका खर्च आला आहे. येत्या ८ फेब्रुवारीला म्हणजे चीनच्या नववर्षाचे औचित्य साधून हे चर्च लोकांसाठी खुले होईल. स्थानिक सरकारचे प्रतिनिधी पॅन तुसुई पिंग यांनी ‘बीबीसी’ला सांगितले की, हे चर्च नेहमीच्या प्रार्थनेसाठी वापरले जाणार नाही. केवळ लग्नापूर्वीचे फोटो शूट व लग्न समारंभासाठी ते वापरले जाईल. ही वास्तू संपन्न व शृंगारिक असावी असा आमचा आग्रह होता. प्रत्येक मुलीला आपण वधूवेशात कसे दिसतो याचे आकर्षण असतेच, अशा वधूने इथे फोटो काढावेत अशी योजना आहे. शिवाय हे चर्च उभारण्यामागे एक जुनी कथाही आहे. १९६० मध्ये वँग आडनावाच्या एका मुलीला ‘ब्लॅकफूट’ रोग झाला. त्यामुळे तिचे दोन्ही पाय कापावे लागले. तिचे जमलेले लग्न मोडले. परिणामी ती आजन्म अविवाहित चर्चमध्येच राहिली. या मुलीच्या आदरार्थ हे बुटाच्या आकाराचे चर्च बांधले आहे. (वृत्तसंस्था)
बुटाच्या आकाराचे चर्च
By admin | Published: January 17, 2016 1:59 AM