ऑनलाइन लोकमत -
वॉशिंग्टन, दि. 03 - एफ 16 लढाऊ विमानांची खरेदी करायची असेल तर ती आपल्या पैशाने करा असा सल्ला अमेरिकेने पाकिस्तानला दिला आहे. अमेरिकेन काँग्रेसच्या सदस्यांनी सरकारी निधीचा वापर करण्यास केलेल्या विरोधानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात अमेरिकी सरकारने पाकिस्तानला आठ एफ 16 लढाऊ विमाने विकण्याचा निर्णय घेतला होता. लॉकहीड मार्टीन कॉर्पोरेशन लिमिटेडने या विमानांच उत्पादन केलं आहे. विमानांसोबत रडार आणि इतर साहित्याचीदेखील विक्री करण्यात येणार होती. यासाठी 700 मिलियन डॉलर्स खर्च येणार होता.
सिनेट परराष्ट्र संबंध समितीचे अध्यक्ष बॉब कॉर्कर यांनी सरकारी निधीचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी आपण आपल्या विशेष अधिकारांचा वापर करणार असल्याचं सांगितलं आहे. यामुळे पाकिस्तानला दहशतवाद्यांविरोधात लढणं आपलं मुख्य उद्धिष्ट आहे असा संदेश जाईल असा दावा बॉब कॉर्कर यांनी केला आहे.
परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी काँग्रेसच्या सदस्यांनी केलेल्या विरोधामुळे पाकिस्तानला एफ 16 विमानांची खरेदी करण्यासाठी सरकारी निधीतून मदत केली जाऊ शकत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 'काँग्रेसच्या सदस्यांनी केलेल्या विरोधामुळे आम्ही पाकिस्तानला राष्ट्रीय निधी उभारण्यास सांगितलं आहे', अशी माहिती जॉन किर्बी यांनी दिली आहे.
याअगोदरही पाकिस्तानला एफ16 लढाऊ विमाने विकण्याच्या ओबामा प्रशासनाच्या निर्णयावरुन अमेरिकेतील खासदारांनी चिंता व्यक्त केली होती. या लढाऊ विमानांचा वापर दहशतवादाशी लढण्याऐवजी भारताविरोधात केला जाऊ शकतो अशी चिंता व्यक्त करण्यात आली होती. ओबामा प्रशासनाने आपल्या निर्णयावर फेरविचार करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.