निव्वळ मूर्खपणा! भारतावर निर्बंध लादायला निघालेल्या बायडन यांना धक्का; खासदारानं सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 03:29 PM2022-03-09T15:29:20+5:302022-03-09T15:36:55+5:30
बायडन प्रशासन काटसा कायद्याच्या अंतर्गत भारतावर निर्बंध घालण्याच्या विचारात
नवी दिल्ली: रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध सुरू होऊन दोन आठवडे होत आले आहेत. मात्र अद्याप तरी युद्ध संपेल अशी शक्यता दिसत नाही. युद्धाचे परिणाम जगभर दिसत आहे. रशियाविरोधात अमेरिका आणि युरोपियन देश उभे ठाकले आहेत. त्यांनी रशियावर विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत. मात्र भारतानं रशियाविरोधात ठोस पावलं उचललेली नाहीत. भारतानं रशियासोबत एस-४०० क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेच्या खरेदीसाठी करार केला आहे. त्यामुळे अमेरिका भारतावर निर्बंध लादण्याच्या विचारात आहे. मात्र यावरून अमेरिकन सरकारला त्यांच्याच देशातून विरोध होताना दिसत आहे.
रशियाकडून शस्त्रास्त्रं खरेदी करतो म्हणून बायडन प्रशासनानं भारतावर निर्बंध लादण्यासाठी पाऊल उचलल्यास ते मूर्खपणाचे ठरेल, असं अमेरिकेतील खासदार टेड क्रूझ यांनी म्हटलं आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी भारताची ओळख आहे. भारत हा महत्त्वाचा भागीदार आहे. बायडन सरकारनं भारतावर निर्बंध लादल्यास तो निर्णय दुर्दैवी असेल, असं क्रूझ म्हणाले. भारतानं रशियासोबत एस-४०० क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेसाठी करार केल्यानं अमेरिका नाराज आहे.
काटसा (CAATSA) एक अमेरिकन कायदा आहे. त्याच्या अंतर्गत अमेरिकेच्या अध्यक्षांना शत्रुराष्ट्र असलेल्या रशिया, इराण आणि उत्तर कोरिया या देशांकडून संरक्षण साहित्य खरेदी करणाऱ्या देशांवर आर्थिक आणि लष्करी निर्बंध लादण्याचा अधिकार आहे. भारताविरोधात काटसा अंतर्गत निर्बंध लादण्याचा बायडेन प्रशासनाचा विचार आहे.
भारत अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार आहे. रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा खरेदी करतो म्हणून त्यावर काटसा लावणं मूर्खपणा ठरेल. अमेरिका भारतावर काटसा अंतर्गत कारवाई करेल अशा बातम्या येत आहेत. असं घडल्यास जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीविरोधात केलेली ही कारवाई मूर्खपणा ठरेल, असं क्रूझ म्हणाले. अमेरिकेच्या परराष्ट्र प्रकरणांशी समितीत ते बोलत होते.