Israel Iran War: इराण आणि इस्रायल यांच्यामधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. इराणने अलीकडेच इस्रायलवर हल्ला केला होता. तेव्हा इस्रायलवर १८० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली होती. त्यानंतर आता इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळाकडून मोठी बातमी समोर आली आहे. इस्रायलने आता इराणमधील सत्ताबदल आपले ध्येय बनवले आहे.
इराणला टारगेट करण्यास इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखाली रात्री उशिरा हा निर्णय घेण्यात आला. इराणने इस्रायलवर हल्ला केल्यापासून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई आणि त्यांची टीम इस्रायलच्या निशाण्यावर आहे. इस्रायलने सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई आणि त्यांच्या टीमला सत्तेवरून हटवण्याची आणि इराणी लोकांना कट्टरतावादी राजवटीपासून मुक्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
इराणमध्ये सत्ताबदल झाल्याशिवाय इस्रायल स्वतःला सुरक्षित समजत नाही. इराणची राजवट उलथून टाकण्याबाबत इस्रायलने अमेरिकेशी यापूर्वीच चर्चा केली आहे. इस्रायलने पाच तासांची मॅरेथॉन बैठक घेतली आणि त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू यांच्यात ३० मिनिटे चर्चा झाली. तसेच, इस्रायलसाठी धोकादायक बनलेल्या इराणची राजवट उलथून टाकण्याची ब्लू प्रिंट अमेरिकेने तयार केली आहे.
इराणने इस्रायलवर केला होता हल्ला इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या मुख्यालयावर हल्ला केला, ज्यात हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्लाह मारला गेला. हसन नसराल्लाहच्या मृत्यूनंतर इराणने १ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला आणि इस्रायलवर १८० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यानंतर अमेरिकेनेही इस्रायलला पाठिंबा देत हा हल्ला निष्फळ असल्याचे म्हटले. त्याचवेळी इस्रायलने असा दावाही केला होता की, आमच्या अॅडव्हान्स हवाई क्षेत्रामुळे इराणने डागलेले क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केले. या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू म्हणाले होते की, इराणला त्याचे परिणाम भोगावे लागतील आणि जो कोणी आमच्यावर हल्ला करेल आम्ही त्यांच्यावर हल्ला करू.