ऑनलाइन लोकमत
चामोनिक्स, दि. ९ - फ्रान्सच्या आल्प्स पर्वतरागांमध्ये मॉन्ट ब्लान्क येथे केबल कारमध्ये अचानक बिघाड झाल्याने ४५ पर्यटकांना संपूर्ण रात्र केबल कारमध्ये काढावी लागली. चामोनिक्स येथील माऊंटन रेसक्यू टीमने हा बिघाड दुरुस्त केल्यानंतर शुक्रवारी सकाळी या ४५ पर्यटकांची सुटाका झाली.
गुरुवारी संध्याकाळी ३६०० मीटर उंचीवर असताना कारवाहून नेणा-या केबल्समध्ये बिघाड झाला. संध्याकाळीच बचावमोहिम सुरु झाल्यानंतर गुरुवारी रात्रीपर्यंत ६५ जणांची सुटका करण्यात आली. त्यानंतर रात्रीचा अंधार आणि हॅलिकॉप्टरसाठी उड्डाणयोग्य वातावरण नसल्याने बचाव मोहिम थांबवावी लागली.
त्यामुळे ४५ पर्यटकांना संपूर्ण रात्र केबल कारमध्ये काढावी लागली. जे नागरीक अडकले होते त्यांच्या ब्लँकेट, पाणी आणि अन्नाची व्यवस्था करण्यात आली होती. आल्पसमध्ये रात्रीच्यावेळी पार गोठवून टाकणारी थंडी असते.
आल्प्स पर्वतरांगांविषयी माहिती
- आल्प्स पर्वतरांगा फ्रान्स, इटली आणि स्विर्त्झलंड या तीन देशांमध्ये पसरल्या आहेत.
- आल्प्स पर्वतरांगा फिरण्यासाठी हे पर्यटक दुपारच्यावेळी निघाले तेव्हा कमाल तापमान २० अंश सेल्सिअस होते, ज्यावेळी हे पर्यटक अडकले त्यावेळी किमान तापमान ८ अंश सेल्सिअस होते.
- जिथे केबल कार बिघडली ते मॉन्ट ब्लान्क हे आल्प्स पर्वतरागांमधील सर्वाधिक उंचीचे शिखर आहे. समुद्रसपाटीपासून १५,७७७ फूट उंचावर हे शिखर आहे.
- मॉन्ट ब्लान्क हे समुद्रसपाटीपासून उंचावर असलेले जगातील ११ व्या क्रमांकाचे आणि युरोपातील दुस-या क्रमांकाचे बर्फाच्छादित शिखर आहे.
- भारताचे महान अणूशास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा यांचे विमान याच आल्प्स पर्वतरांगांमध्ये जानेवारी १९६६ मध्ये संशयास्पदरीत्या कोसळले होते. या विमानाचे अवशेष कधीही सापडले नाहीत. मॉन्ट ब्लांकजवळ झालेल्या या अपघातामुळे भारताच्या विज्ञान आणि अणूकार्यक्रमाचे मोठे नुकसान झाले