अमेरिका: कॅलिफोर्नियातील जंगलात भडकलेल्या आगीत २ दशलक्ष हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक झाली आहे. आणखी विध्वंसाची भीती लक्षात घेऊन अमेरिकी वन सेवा विभागाने दक्षिण कॅलिफोर्नियातील सर्व आठ राष्ट्रीय वने बंद केली आहेत.
कोरड्या उन्हाळ्यानंतर कॅलिफोनिर्यात पानगळतीचा हंगाम सुरू होतो. हा काळ आगींसाठी अधिक धोकादायक मानला जातो. राज्याच्या इतिहासातील तीन मोठ्या आगींपैकी दोन आगी सॅन फ्रान्सिस्को बे एरियात धुमसत आहेत. १४ हजार अग्निशामक जवान आग विझविण्यासाठी झगडत आहेत. तीन दिवसांच्या उष्णतेच्या लाटेने तापमान प्रचंड वाढले आहे. त्यातच कोरडे वारे आगीला भडकावत आहे. वीज तारांच्या स्पार्किंगमुळे नव्या ठिकाणी आगी लागू नयेत यासाठी २१ परगण्यांतील (काउंटी) १,५८,००० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची तयारी ‘पॅसिफिक गॅस अँड इलेक्ट्रिसिटी’ने चालविली आहे.
पॅसिफिक नैऋत्य विभागाच्या वन सेवा प्रादेशिक अधिकारी रँडी मूर यांनी आठ राष्ट्रीय वने बंद करण्याचा निर्णय घोषित केला. या निर्णयाचा रोजच्या रोज आढावा घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. सर्व राष्ट्रीय वनांतील कॅम्पग्राउंड्स बंद करण्यात आले आहेत. हवामानाची स्थिती वाईट असल्यामुळे आणखी नव्या ठिकाणी आग लागण्याचा धोका आहे. प्रत्येक आग विझविण्याची आमची क्षमता नाही, असे मूर यांनी सांगितले. कॅलिफोर्निया वने व आग संरक्षण विभागाचे प्रवक्ते लिन्ने टॉल्मॅकॉफ यांनी सांगितले की, सप्टेंबर आणि आॅक्टोबरचा काळ येथे आगीसाठी पोषक असतो. कारण सर्व गवत आणि वनस्पती वाळलेल्या असतात आणि वारा जोराचा असतो.