काठमांडू : २५ एप्रिलला झालेल्या भूकंपाने संपूर्ण नेपाळ कोलमडून पडला आहे. गेल्या ९ दिवसांपासून ३४ देशांच्या टीम्स आणि तब्बल १२९ स्निफर डॉग्ज येथे कार्यरत आहेत. या सगळ्या टीम्सला त्या त्या देशांनी माघारी बोलावून घ्यावे, असे आवाहन नेपाळ सरकारने केले आहे. भूकंपानंतर अवघ्या तीन तासांंत नेपाळमध्ये सक्रिय झालेले भारतीय पथक एनडीआरएफ देखील भारतात परतणार आहे. शिल्लक राहिलेले ढिगारे उपसण्याचे काम नेपाळी यंत्रणा आता करू शकेल, असे नेपाळने स्पष्ट केले आहे.तथापि, पुनर्वसनाचे महाप्रचंड काम नेपाळला हाती घ्यावे लागणार आहे. या कामासाठी जगाने शक्य ती सर्व मदत करावी, असे नेपाळ सरकारने म्हटले आहे. एनडीआरएफची टीम भारतात परत येणार असली तरी भारतीय सैन्याची अभियांत्रिकी टीम नेपाळमध्ये येणार आहे. या टीमच्या माध्यमातून कायमस्वरूपी पुनर्वसनाचे ठोस काम हाती घेण्यात येणार आहे. नेपाळच्या गृह विभागाचे प्रवक्ते लक्ष्मीप्रसाद धाकल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ३४ देशांच्या टीम्स नेपाळमध्ये कार्यरत आहेत. त्यात भारताचे ९६२, चीनचे ३७०, पाकिस्तानचे ८७, श्रीलंकेचे १४०, तुर्कीचे ७९ यांच्यासह विविध देशांचा यात समावेश आहे.
मदत पथकांना माघारी बोलवा!
By admin | Published: May 05, 2015 2:27 AM