एखाद्या व्यक्तीला त्याच्या टक्कल पडण्यावरून बोलले जाते, ऑफिसमध्ये, मित्रांमध्ये खिल्ली उडविली जाते, असे केल्यास ब्रिटनमध्ये मोठा गुन्हा मानला जाणार आहे. ब्रिटनच्या न्यायालयाने यास लैंगिक शोषण असे म्हटले आहे. इंप्लॉयमेंट ट्रिब्यूनलने एका प्रकरणात हा निर्णय दिला आहे.
एक कर्मचारी टोनी फिन हा त्याला टकला म्हणत असल्याची तक्रार घेऊन न्यायालयात गेला होता. यॉर्कशायरमधील एक कंपनीत तो २४ वर्षे काम करत होता, गेल्या वर्षी त्याला कंपनीने कामावरून काढून टाकले होते. यानंतर तो न्यायालयात गेला होता. कंपनीवर खटला दाखल करताना टोनीने त्यात लैंगिक शोषणाचा दावाही केला आहे. डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार टोनीने दाव्यात म्हटले की, फॅक्टरी सुपरवायझर जॅमी किंगने एका घटनेवेळी लैंगिक शोषण केले होते. काम करत असताना जॅमीने त्याला टकला म्हणत शिवी दिली होती. यावर न्यायाधीशांनी म्हटले की, महिलांच्या तुलनेत पुरुषांचे केस जास्त गळतात. यामुळे कोणत्याही व्यक्तीला या शब्दाचा वापर करणे हे भेदभाव केल्यासारखेच आहे.
तीन सदस्यांच्या एका पॅनलने या प्रकरणी आपला निर्णय दिला. एखाद्या व्यक्तीला टकला म्हणणे हे एखाद्या स्त्रीच्या ब्रेस्टवर टिपण्णी करण्यासारखे आहे, असे न्यायालयाने म्हटले. टक्कलावर बोलणे हे केवळ अपमानच नाही तर प्रत्यक्षात ते लैंगिक शोषण असल्याचे न्यायाधीश जोनाथन ब्रेन यांनी म्हटले. "आमच्या निकालात, 'टक्कल' हा शब्द आणि सेक्सचे संरक्षित वैशिष्ट्य यांच्यात परस्परसंबंध आहे," असे पॅनेलने म्हटले आहे.
फिनसाठी टक्कल हा शब्द वापरणे ही अपमानास्पद प्रथा असल्याचे, यामुळे फिनच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असून त्याच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आम्हाला ते लैंगिकतेशी संबंधित आढळली, असे न्यायालयाने म्हटले आहे.