मुंबई - भारतीयांची फेसबुकवरील माहिती चोरून गैरवापर करणाऱ्या ब्रिटनच्या केंब्रिज अॅनालिटिकानं आपले सारे कामकाज त्वरित बंद केल्याची घोषणा केली आहे. या कंपनीने अमेरिका आणि ब्रिटनमध्ये स्वतःला दिवाळखोर घोषित करण्यासाठी निवेदन देण्याचीही घोषणा केली आहे. आता व्यवसायात राहण्याची कोणतीही शक्यता नाही, असंही कंपनीनं सांगितले आहे. केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीवर फेसबुकच्या कोट्यवधी लोकांचा व्यक्तिगत डेटा चोरी करून दुरुपयोग केल्याचा आरोप आहे.
केम्ब्रिज अॅनालिटिका ही अमेरिकेतील एक मोठी अॅनॅलिसिस फर्म आहे. या कंपनीने 2016 मध्ये पार पडलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी काम केल्याने त्याची चर्चा झाली होती. या निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा झालेल्या विजयाचे श्रेय केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीलाही दिले गेले. 'न्यूयॉर्क टाइम्स'ने दिलेल्या माहितीनुसार, 2013 मध्ये केम्ब्रिज अॅनालिटिकाची स्थापना करण्यात आली होती. ट्रम्प यांच्या आधी या कंपनीने सेनेटर टेड क्रूझ यांच्यासाठीही काम केले होते.
केम्ब्रिज अॅनालिटिका ही मोठ्या प्रमाणावर डेटा पुरवणारी कंपनी आहे. या कंपनीचे संस्थापक क्रिस्टोफर वाइली यांनी 2016 मध्ये या कंपनीच्या काम करण्याच्या पद्धती समोर आणल्या होत्या. 2014 मध्येच वाइली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. 5 कोटी फेसबुक युजर्सचा डेटा चोरीला गेल्याची बाब त्यांनी उघडकीस आणली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती.
केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणात फेसबुकचा वापर करणाऱ्यांची खासगी माहिती सुरक्षित ठेवून तिचा गैरवापर होऊ न देण्यासाठी पुरेसे उपाय न केल्याबद्दल फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी अमेरिकन काँग्रेसपुढे दिलगिरी व्यक्त केली. झुकरबर्ग यांची काँग्रेससमोर प्रथमच साक्ष झाली. यावेळी त्यांनी 87 दशलक्ष वापरकर्त्यांच्या खासगी माहितीला सुरक्षित ठेवण्यात आणि फेसबुकचा गैरवापर रोखण्यात अपयश आल्याची जबाबदारी स्वीकारली. आमच्या जबाबदारीची व्यापक भूमिका काय हे आम्ही समजून घेतले नाही व ती मोठी चूक होती. ती माझी चूक होती, मी दिलगीर आहे,’ असे झुकरबर्ग यांनी लेखी साक्षीत म्हटले. निवडणुकीत विदेशांचा हस्तक्षेप झाला व द्वेषाच्या भाषणातही वापर झाला, असे झुकरबर्ग म्हणाले. फेसबुकच्या लक्षावधी वापरकर्त्यांच्या खासगी माहितीचा ब्रिटिश राजकीय सल्लागार कंपनी केंब्रिज अॅनालिटिकाकडून गैरवापर झाल्यामुळे मोठे वादळ निर्माण झाले आहे. झुकरबर्ग यांनी मीसुद्धा आदर्शवादी होतो व दोन अब्ज लोक जे माध्यम वापरतात त्याचा कसा गैरवापर व लबाडीसाठी केला जाऊ शकतो याचे आकलन होऊ शकले नाही, असे म्हटले आहे.
फेसबुकवर घडेल त्याला मी जबाबदार‘मी फेसबुक सुरू केले. ते मी चालवतो आणि येथे जे काही घडले त्याला मी जबाबदार आहे. त्या माहितीचा गैरवापर न होण्यासाठी आम्ही पुरेसे काही केले नाही हे तर स्पष्टच आहे. त्याचा खोट्या बातम्यांसाठी वापर झाला, असेही झुकरबर्ग म्हणाले़