ऑनलाइन लोकमत
टोरंटो, दि. 27 - कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुदाँ नेहमी आपल्या वेगवेगळ्या कामांमुळे आंतरराष्ट्रीय मीडियात चर्चेला असतात. आपल्या सकारात्मक कामं आणि धोरणांमुळे ते नेहमी चर्चेत असतात. यामुळेच जस्टिन त्रुदाँ यांचे समर्थक फक्त कॅनडापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. गेल्याच आठवड्यात जस्टिन त्रुदाँ यांनी असं काही केलं, की पुन्हा एकदा त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पंतप्रधान जस्टिन त्रुदाँ आपल्या कार्यालयात एका पाच वर्षाच्या मुलीसोबत खेळतानाचे फोटो प्रसिद्द झाले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी तिला एक दिवसासाठी पंतप्रधानही करुन टाकलं.
सीबीसी किड्सच्या एका स्पर्धेत पाच वर्षाच्या बेला थॉम्पसनने पहिला क्रमांक पटकावला होता. स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवल्याने तिला एका दिवसासाठी पंतप्रधान कार्यालयात जाण्याची संधी मिळाली. बेला जेव्हा पंतप्रधान कार्यालयात पोहोचली तेव्हा पंतप्रधान जस्टिन त्रुदाँ यांच्यासोबत चांगली रमलेली दिसली. दोघांनीही खेळत चांगला वेळ घालवला. यावेळी पंतप्रधान जस्टिन त्रुदाँ यांनी कार्यालयातील सामानाचा वापर करत बेलाचं मनोरंजन केलं. सीबीसी किड्सने दोघांचे फोटो ट्विट केले आहेत. "जेव्हा एक पाच वर्षाचं मूल एक दिवसांसाठी पंतप्रधान बनतं, तेव्हा काय होतं ?", असं कॅप्शनही दिलं आहे.
बेलाने कार्यालयातील उशांचा वापर करत एका इमारतच तयार केला आणि आपल्या टेडीला त्यावर बसवलं. बेलाने जेव्हा स्पर्धा जिंकली होती तेव्हा तिला पंतप्रधान झाल्यावर काय करणार ? असा प्रश्न विचारला असता मी सर्वांसाठी घरं बनवण्याची इच्छा तिने व्यक्त केली होती. म्हणून मग तिने ही इमारत उभी केला.
स्वत: पंतप्रधान जस्टिन त्रुदाँ यांनी बेलासोबतचे फोटो ट्विट करत माझं कार्यालय नव्याने सजवण्यात आल्याचं सांगितलं. ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, "गेल्या आठवड्यात आम्ही कार्यालयात वेगळी सजावट केली. बेला आणि तिच्या कुटुंबियांनी माझ्या कार्यालयात आणल्याबद्दल सीबीसी किड्सचे आभार".
याआधी काही दिवसांपुर्वी जस्टिन त्रुदाँ यांनी पंतप्रधान कार्यालयात आपल्या तीन वर्षाच्या मुलासह येऊन लपाछपी खेळत अनेक महत्त्वाची कामेही पार पाडली होती. आपल्या मुलासोबतचा फोटोही त्यांनी ट्विट केला होता. यानंतर अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. जस्टिन त्रुदाँ नेहमी काहीचरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्यातील माणुसकीची नेहमीच चर्चा करत कौतुक केलं जातं.