कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे नर्णय त्यांच्याच अंगाशी येताना दिसत आहेत. कॅनडाच्या संसदेत एका नाझी सैनिकाला सन्मानित करण्यात आले. यानंतर, ट्रुडो यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्थरावर टीका होत आहे. आता रशियानेही कॅनडाला फटकारले आहे. यापूर्वी, संयुक्त राष्ट्र महासभेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही कॅनडावर जोरदार टीका केली होती. कॅनडा दहशतवाद्यांसाठी एक सुरक्षित ठिकाण बनले आहे, असे त्यांनी म्हटले होते. तर आता कॅनडा नाझींसाठी स्वर्ग बनला असल्याचे, रशियाने म्हटले आहे.
कॅनडाच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष अँथनी रोटा यांनी 98 वर्षीय यारोस्लाव्ह हंका यांना 'वॉर हीरो' म्हणून संबोधले. यानंतर त्यांनी माफाही मागितली. मात्र कॅनडाच्या या कृतीमुळे रशिया नाराज झाला आहे. यासाठी कॅनडाला स्पष्टिकरण द्यावे लागेल, असे ओटावा येथे रशियन राजदूत स्टेपानोव्ह यांनी म्हटले आहे. ओलेग स्टेपानोव्ह यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी आर्मी युनिटसाठी लढणाऱ्या सैनिकाला सन्मानित केल्याबद्दल ट्रूडो यांच्यावर टीका केली आहे. स्पुतनिकच्या वृत्तानुसार, स्टेपानोव्ह यांनी रोटा यांच्या या कृतीचा निषेध केला आहे. यासाठी त्यांनी कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे आणि पंतप्रधान कार्यालयाकडे स्पष्टिकरण मागीतले आहे.
भारतानंही फटकारलं -भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी लिहिले आहे की, 'कॅनडा युक्रेनिअन नाझिंसाठी केवळ एक सुरक्षित स्वर्गच राहणार नाही. उभे राहून एका माजी नाझी सैनिकाचा अशा पद्धतीने जय-जयकार करणे, सर्व काही सांगून जाते. देवाची कृपा आहे की, झेलेंस्की यांच्या आजोबांनी हे पाहिले नाही की, त्यांचा नातू काय बनला आहे.' तत्पूर्वी, भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनीही कॅनडाला ''दहशतवाद्यांसाठीचे एक सुरक्षित आश्रयस्थान," म्हटले होते.