Canada Hindu temple attack : कॅनडात खलिस्तानी समर्थकांची हिंमत दिवसेंदिवस वाढत आहे. खलिस्तानी समर्थक आता उघडपणे भारताच्या विरोधात घोषणा देत आहेत, हिंदूंवर आणि मंदिरांवर हल्ले करत आहेत. दरम्यान, गेल्या रविवारी कॅनडातील ब्रॅम्प्टन येथील हिंदू मंदिरावर हल्ला केल्याप्रकरणी कॅनडाच्या पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. येथील पील प्रादेशिक पोलिसांनी (पीआरपी) सांगितले की, ब्रॅम्प्टन येथील ३५ वर्षीय इंद्रजित गोसल याला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याच्यावर शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी एका पत्रकाद्वारे सांगितले की, इंद्रजित गोसल याला अटक करण्यात आल्यानंतर कोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर काही अटींवर त्याची सुटका करण्यात आली. पुढील तारखेला तो ब्रॅम्प्टनमधील ओंटारियो कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये हजर होणार आहे. दरम्यान, यापूर्वी हिंदू मंदिरावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती.
इंद्रजित गोसल हा हिंदू मंदिर हल्ल्याचा मास्टरमाईंड असून खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूचा जवळचा असल्याचे म्हटले जात आहे. ग्रेटर टोरंटो येथील हिंदू मंदिरावर हल्ला करण्याची योजना इंद्रजित गोसलने आखली होती. तसेच, गेल्या वर्षी १८ जून रोजी हरदीप सिंग निज्जरची हत्या झाल्यानंतर इंद्रजित गोसलने सार्वमताचे मुख्य कॅनेडियन आयोजक म्हणून आपले स्थान निर्माण केले. निज्जरच्या हत्येनंतर तो रेफरेंडम संबंधित कामे पाहत आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?कॅनडातील हिंदू सभा मंदिरात गेल्या रविवारी काही हिंदू भाविकांवर खलिस्तानवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्याचा प्रतिकार हिंदू भाविकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर मंदिर परिसरातच तुफान हाणामारी झाली होती. या घटनेमध्ये काहीजण जखमी झाले. दरम्यान, आम्ही मंदिर परिसरात भारतीय उच्चायुक्त दर्शनासाठी येण्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करत होतो, असे म्हणत सिख फॉर जस्टिस या खलिस्तानवादी संघटनेने हा हल्ला केल्याचा दावा फेटाळून लावला होता.
खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात कारवाईची मागणीकॅनडातील ब्रॅम्प्टन येथील हिंदू मंदिरावरील हल्ल्याबाबत भारताने कठोर भूमिका घेतली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जस्टिन ट्रुडो सरकारला भारतीयांना धमकावू नका, असा स्पष्ट इशारा दिला आहे. आमच्या उच्चायुक्तांना आमच्या लोकांपर्यंत पोहोचण्यापासून रोखू नका, त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नका, असे भारताने स्पष्टपणे सांगितले आहे. याशिवाय,प्रार्थनास्थळांवर होणारे हल्ले त्वरित थांबवावे आणि दोषी खलिस्तानींना तात्काळ अटक करावी, अशी मागणीही केली आहे. तसेच, अशा घटनेमुळे कॅनडातील हिंदूंमध्ये संताप वाढत आहे. कॅनेडियन नॅशनल कौन्सिल ऑफ हिंदूने खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात कारवाईची मागणी करणारा मोठा निर्णय घेतला.