India Canada Rift, Bangladesh: खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडात सुरू असलेल्या वादात बांगलादेशने मोदी सरकारला उघडपणे पाठिंबा दिला आहे. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री एके अब्दुल मोमेन म्हणाले की, कॅनडा हा अड्डा बनत चालला आहे. यापूर्वी भारताने असेही म्हटले होते की, कॅनडा आता दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान बनत आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निज्जर हत्येसाठी भारताची गुप्तचर संस्था रॉला जबाबदार ठरवल्यानंतर बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांचे हे वक्तव्य आले आहे.
बांगलादेशच्या मंत्र्याने सांगितले की कॅनडाने शेख मुजीबुर रहमानचा मारेकरी नूर चौधरीचे प्रत्यार्पण केलेले नाही. खुद्द नूर चौधरीने बांगलादेशच्या अधिकाऱ्याची हत्या केल्याची कबुली दिली असूनही त्यांनी त्याचे प्रत्यार्पण केलेले नाही. मोमेन म्हणाले, "कॅनडा सर्व खुन्यांचे आश्रयस्थान बनू नये असे मला वाटते. सध्या तरी खुनी लोक कॅनडामध्ये जाऊन आश्रय घेऊ शकतात. ते तिथे मजेत राहतात. पण त्यांनी ज्यांचा खून केलाय, त्यांचे कुटुंबीय मात्र यातना भोगत, दुःखात जगत आहेत."
कॅनडाचा कायदा खुन्यांना मदत करणारा...
प्रत्यार्पणाबाबत कॅनडाच्या भूमिकेला जगातील इतर देशांमध्येही विरोध वाढत असल्याचे बांगलादेशी मंत्र्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. कॅनडा फाशीच्या शिक्षेच्या विरोधात आहे आणि त्यामुळेच तेथील कायद्याचा फायदा घेऊन गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी होतात. फाशीच्या शिक्षेबाबत मोमेन म्हणाले की, आपली न्यायव्यवस्था खूप स्वतंत्र आहे आणि बांगलादेश सरकार त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. मात्र नूर चौधरीला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. जर नूर चौधरी आणि रशीद चौधरी बांगलादेशात परतले तर ते बांगलादेशच्या राष्ट्रपतींकडे दयेची विनंती करू शकतात.
मोमेन म्हणाले की, राष्ट्रपती या दोघांवर दया दाखवू शकतात आणि त्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलू शकतात. ते म्हणाले की, मानवी हक्कांचा अनेक लोकांनी अनेकदा गैरवापर केला आहे. खुन्यांना संरक्षण देण्यासाठी हे एक निमित्त झाले आहे हे खरोखरच दुर्दैवी आहे. बांगलादेशी मंत्री म्हणाले की, आमचे भारतासोबत खूप चांगले संबंध आहेत आणि कॅनडासोबतही चांगले संबंध आहेत. आम्ही नूर चौधरीसाठी कॅनडाला अनेकवेळा विनंती केली आहे, परंतु आजपर्यंत कॅनडा आमच्या आवाहनाकडे लक्ष दिलेले नाही.