Canada Immigration policy, Indian Students: कॅनडा आणि भारत यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय तणावाचे वातावरण दिसून आले. कॅनडातूनभारतात येणाऱ्या प्रवाशांवर काही निर्बंध होते. तसेच कॅनडानेही भारतीय प्रवाशांवर काही नियम व अटी लागू केल्या होत्या. तशातच आता कॅनडाने आता धोरणात काही बदल केले आहेत. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांच्या जीवनावर काही परिणाम होऊ शकतो असे बोलले जात आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये लिहिले, "आम्ही कॅनडात येणाऱ्या कमी पगाराच्या, तात्पुरत्या परदेशी कामगारांची संख्या कमी करत आहोत. श्रमिक बाजारपेठ बदलली आहे. आता आमच्या व्यवसायिकांनी कॅनडाच्या कामगार आणि तरुणांमध्ये गुंतवणूक करण्याची वेळ आली आहे." कॅनडामध्ये करण्यात आलेल्या या धोरणात्मक बदलाविरोधात आता विद्यार्थ्यांची तेथे आंदोलनेही सुरू झाली आहेत. पण ट्रुडो यांच्या घोषणेनंतर कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय कामगार आणि विद्यार्थ्यांना स्थानिकांकडून विरोध सुरू झाला.
कॅनडाच्या सरकारने आतापर्यंत असे म्हटले आहे की स्थलांतरितांना येथे आणण्याचे मुख्य कारण म्हणजे आर्थिक वाढ आणि लवचिकता वाढवणे. आता धोरणातील बदलानंतर भारतीय विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे. कॅनडामध्ये राहणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांपैकी ४० टक्के विद्यार्थी हे भारतातील आहेत. त्यामुळे या धोरणात्मक बदलांमुळे सुमारे ७० हजारांहून अधिक परदेशी विद्यार्थ्यांवर कॅनडामध्ये मायदेशी परत जाण्याची टांगती तलवार असणार आहे.