ओटावा- येत्या 17 ऑक्टोबर रोजी कॅनडामध्ये गांजाला कायदेशीर मान्यता मिळणार आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनीच ही घोषणा केली आहे. गांजाला कायदेशीर मान्यता देणारा कॅनडा हा जी-7 देशांमधील पहिलाच देश असेल. कॅनडाच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांनी गांजाला कायदेशीर ठरविण्यात यावे यासाठी संमती दिली. पाच वर्षांपुर्वी उरुग्वे देशानेही अशीच मान्यता दिली होती. त्यानंतर कॅनडाने गांजाच्या वापरावरील निर्बंध काढून घेतले आहेत.
याबाबत बोलताना ट्रुडो म्हणाले, आमची व्यवस्था सुधारण्यासाठी, तरुणांचे रक्षण करण्यासाठी आणि संघटीत गुन्हेगारीमधील पैशाचे बळ काढून घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये प्रश्नोत्तराच्यावेळेस बोलताना ट्रुडो यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 1923 साली कॅनडामध्ये गांजावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर 2001 साली गांजाचा औषधासाठी वापर करण्यास मान्यता दिली. आता नव्या नियमानुसार सर्व प्रौढ (18 किंवा 19 वय पूर्ण केलेले नागरिक, संबंधित प्रांतांच्या नियमान्वये) गांजाचा वापर करु शकणार आहेत व एका मर्यादेपर्यंत त्यांची लागवडही करु शकणार आहेत.
प्रत्येक कुटुंबाला एकावेळेस गांजाची 4 रोपे घरात लावता येतील तसेच एक व्यक्ती एकावेळेस 30 ग्रॅम पर्यंत गांजा बाळगू शकेल. गांजाविक्री करणाऱ्या दुकानांकडून करही गोळा करण्यात येणार आहे. गांजाच्या व्यापारातून कॅनडा सरकारला कराच्या माध्यमातून भरपूर पैसा उपलब्ध होणार आहे.