No Entry in Mosques in Canada: रमजानपूर्वी कॅनडातील मुस्लिमांनी मोठा निर्णय घेतला आहे. तब्बल ३००हून अधिक मुस्लिम संघटनांनी जाहीर केले आहे की, ज्यांनी मानवाधिकारांचे रक्षण करण्यासाठी पावले उचलली नाहीत आणि गाझामधील इस्रायलच्या हल्ल्यांचा निषेध केला नाही अशा खासदारांना कॅनेडामधील मशिदींमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. मुस्लिम संघटनांनी खुले पत्र लिहून ही घोषणा केली आहे. जोपर्यंत खासदार इस्रायलचा निषेध करत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांना मशिदींमध्ये येऊ देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
पवित्र रमजान महिना सुरू होण्यास अवघा काहीच दिवसांचा अवधी उरला आहे. अशा स्थितीत गाझातील नागरिक सतत इस्रायलच्या हल्ल्याचे लक्ष्य बनत आहेत. त्याबद्दल जगभरातील अनेक देश आणि मानवाधिकार संघटना चिंतेत आहेत. गाझामधील इस्रायलच्या युद्धाचा व गुन्ह्यांचा जाहीर निषेध केल्याशिवाय खासदारांचे कोणत्याही मशिदीत स्वागत केले जाणार नाही, असे कॅनडाच्या मुस्लिम संघटनांनी एकमताने म्हटले आहे. कॅनेडियन मुस्लिमांवर महत्त्वपूर्ण प्रभाव असलेल्या नॅशनल कौन्सिल ऑफ कॅनेडियन मुस्लिमांचाही या घोषणा करणाऱ्या संघटनांमध्ये समावेश आहे.
मुस्लिम गटाच्या पत्रात म्हटले आहे की, जर तुम्ही या पत्रात लिहिलेल्या सर्व गोष्टींशी उघडपणे आणि आदरपूर्वक सहमत नसाल तर आम्ही तुम्हाला आमच्या सभांना संबोधित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणार नाही. रमजानचा महिना मानवतेसाठी असल्याचे पत्रात नमूद केले आहे. या महिन्यात आम्ही मशिदींमध्ये अशाच खासदारांचे स्वागत करू, ज्यांनी मानवता वाचवण्यासाठी आवाज उठवला आहे. तसेच इस्रायलच्या युद्धाचा निषेध केला. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, १० मार्चपासून रमजान महिना सुरू होतो. त्यामुळे गाझावरील हल्ले थांबवण्यासाठी आणि इस्रायलला होणारा शस्त्रास्त्रांचा पुरवठा थांबवण्यासाठी खासदारांनी लवकरात लवकर आवाज उठवावा, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.