Kanishka Flight Anniversary : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्याविषयी कॅनडाचे प्रेम अद्यापही कमी झालेलं नाही. वर्षभरापूर्वी अमेरिकेत हरदीपसिंग निज्जर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मात्र कॅनडाची खलिस्तानींबद्दलची सहानुभूती पुन्हा एकदा समोर आली आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप निज्जरसाठी कॅनडाच्या संसदेने मौन पाळले. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये अध्यक्ष ग्रेग फर्गस यांनी निज्जर यांच्यावरील शोकसंदेश वाचला. कॅनडाच्या संसदेने खलिस्तानी दहशतवादी निज्जरला त्याच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. मात्र आता भारतानेही याला प्रत्युत्तर देण्याचे ठरवलं आहे.
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या स्मरणार्थ कॅनडाच्या संसदेत दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. गेल्या वर्षी त्याची हत्या झाली होती. 23 जून रोजी कनिष्क विमान दुर्घटनेला ३९ वर्षे पूर्ण होत असताना कॅनडाच्या संसदेने हे लज्जास्पद कृत्य केले आहे. भारताने हरदीपसिंग निज्जरला दहशतवादी घोषित केले होते. भारताने आता कॅनडाला याबाबत सडेतोड उत्तर देण्याचे ठरवलं आहे. व्हँकुव्हर येथील भारतीय दूतावासाने खलिस्तानी हल्ल्यात कोसळलेल्या एअर इंडियाच्या कनिष्क विमानाच्या ३९ व्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. १९८५ साली झालेल्या या हल्ल्यात ३९ लोक मारले गेले होते.
मंगळवारी कॅनडाच्या संसदेत कामकाज संपत आले असताना सभागृहाच्या अध्यक्षांनी यासंदर्भातील प्रस्ताव मांडला होता. "मला असं वाटतंय की वर्षभरापूर्वी हरदीप सिंग निज्जर याची ब्रिटिश कोलंबिया परिसरात हत्या करण्यात आल्याबद्दल सभागृहात दोन मिनिटांचं मौन पाळण्यावर सर्व सभासदांची सहमती झाली आहे," असे ग्रेग फर्गस यांनी म्हटलं. त्यानंतर हरदीपसिंग निज्जर याला श्रद्धांजली वाहण्यासाठी सभागृहातील सदस्य दोन मिनिटे मौन बाळगून उभे होते. या सगळ्या प्रकारानंतर भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं आहे.
"भारत नेहमीच दहशतवाद आणि दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या आणि जगाच्या शांततेला धोका निर्माण करणाऱ्या सर्व देशांच्या विरोधात उभा राहिला आहे. एअर इंडियाचे विमान कनिष्कवर झालेला हल्ला हा विमान वाहतुकीच्या इतिहासातील सर्वात भ्याड हल्ला होता. या हल्ल्यात ३२९ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला, ज्यात ८६ मुलांचा समावेश होता. २३ जून २०२४ रोजी या हल्ल्याच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त आम्ही त्या सर्वांच्या स्मृतीप्रित्यर्थ एका समारंभाचे आयोजन करणार आहोत. आम्ही सर्व इंडो-कॅनडियन लोकांना या दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एकत्र येण्याचे आवाहन करतो," असे या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
काय होती कनिष्क विमान दुर्घटना?
२३ जून १९८५ रोजी मॉन्ट्रियलहून लंडनला जात असताना एअर इंडियाचे विमान कनिष्क बॉम्बस्फोटांमुळे कोसळे होते. या हल्ल्याची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी संघटनांनी घेतली होती. या हल्ल्यात २६८ कॅनेडियन, २७ ब्रिटिश आणि २४ भारतीय नागरिकांसह ३२९ लोकांचा मृत्यू झाला होता. विमानाच्या इतिहासातील हा सर्वात प्राणघातक हल्ला होता.