Canada Government, Indian Students Immigration Policy: कॅनडामध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता कॅनडामध्ये जाणे थोडे कठीण होणार आहे. कॅनडाच्या सरकारने यावर्षी स्टुडंट व्हिसाचे प्रमाण ३५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ दरवर्षी कॅनडाचे सरकार परदेशी विद्यार्थ्यांना पूर्वीच्या तुलनेत ३५ टक्के कमी व्हिसा जारी करणार आहे. परदेशात शिक्षण घेण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांची कॅनडाला पसंती असते. कॅनडाच्या सरकारच्या या निर्णयाचा फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसू शकतो.
कॅनडा सरकारचे म्हणणे आहे की ते तात्पुरत्या रहिवाशांची संख्या कमी करण्याचा विचार करत आहेत. त्या अंतर्गत हे पाऊल उचलले गेले आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणतात की परदेशी इमिग्रेशन आमच्या अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर आहे, परंतु जेव्हा काही वाईट घटक या व्यवस्थेचा गैरवापर करतात आणि विद्यार्थ्यांचे शोषण करतात, तेव्हा आम्हाला कारवाई करावी लागते. त्यातूनच असा निर्णय घ्यावा लागतो.
"आम्ही या वर्षी ३५ टक्के कमी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परवाने जारी करत आहोत. त्यापुढील वर्षी आणखी १० टक्के कपात केली जाणार आहे," असे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी एका पोस्टच्या माध्यमातून सांगितले. ट्रूडो सरकारच्या म्हणण्यानुसार, २०२५ मध्ये ४ लाख ३७ हजार विद्यार्थी अभ्यास परवाने जारी करण्याचे लक्ष्य आहे. २०२४ मध्ये जारी करण्यात येणाऱ्या ४ लाख ८५ हजारांच्या तुलनेत हे १० टक्के कमी आहे.
भारतीय विद्यार्थ्यांची कॅनडाला पसंती
भारतीय विद्यार्थ्यांसाठी कॅनडा हे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे. अशा परिस्थितीत कॅनडा सरकारच्या या घोषणेचा परिणाम कॅनडामध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांना होण्याची शक्यता आहे. ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तांच्या वेबसाइटनुसार, शिक्षण हे भारत आणि कॅनडामधील परस्पर हितसंबंधांचे प्रमुख क्षेत्र आहे. भारत हा परदेशी विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा स्रोत आहे आणि अंदाजे ४ लाख २७ हजार भारतीय विद्यार्थी सध्या कॅनडामध्ये शिकत आहेत.