Justin Treduea, Nijjar Murder Case, Canada India Relationship: आपल्या मतपेटीच्या राजकारणामुळे भारतासोबतचे संबंध बिघडवणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आता हळूहळू शांततापूर्ण भूमिका घेण्यास इच्छुक दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ट्रुडो सरकारने भारताचा समावेश 'सायबर क्षेत्रातील धोकादायक देश' या यादीत केला होता. त्यावरून भारत-कॅनडा यांच्यातील संबंध अधिक तणावपूर्ण झाले होते. पण आता निज्जर हत्या प्रकरणी कॅनडाचे नवे वक्तव्य समोर आले आहे. निज्जर हत्याकांडात भारत सरकारची कोणतीही भूमिका नाही, असे कॅनडाच्या सरकारने म्हटले आहे. निज्जर हत्याकांडामध्ये भारताचे सर्वोच्च नेतृत्व सहभागी असल्याचा 'द ग्लोब अँड मेल'चा दावा होता. हा दावा कॅनडा सरकारने फेटाळून लावला. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या वृत्तपत्राच्या या वृत्ताचे खंडन केले होते. कॅनडाची प्रसारमाध्यमे भारताची बदनामी करण्यासाठी मोहीम चालवत असल्याचा आरोप भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला होता.
निज्जर हत्या प्रकरणात कॅनडा बॅकफूटवर
निज्जर हत्याकांडात कॅनडाचे सरकार पूर्णपणे बॅकफूटवर आले आहे. भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अनेकवेळा आपली भूमिका बदलली. याआधीही कॅनडाने निज्जर हत्या प्रकरणात भारताविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे कॅनडाने म्हटले होते. आम्ही कोणत्याही पुराव्याशिवाय केवळ गुप्तचर विभागाच्या माहितीच्या आधारे भारतावर आरोप केले होते. कॅनडाने सांगितले की, आम्ही भारतीय सुरक्षा एजन्सींना अधिक तपास करण्यास आणि आम्हाला सहकार्य करण्यास सांगितले कारण त्यावेळी आमच्याकडे केवळ गुप्तचर यंत्रणांची माहिती होती, कोणतेही ठोस पुरावे नव्हते.
कॅनडात झाली होती निज्जरची हत्या
गेल्या वर्षी १८ जून रोजी कॅनडातील सरे येथे हरदीपसिंग निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. भारताने या प्रकरणी कॅनडाचे सर्व आरोप फेटाळून लावले. काही दिवसांपूर्वीच परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, कॅनडाच्या सरकारने सप्टेंबर २०२३ पासून आमच्याशी कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. कॅनडाच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे. कॅनडाने भारतावर गंभीर आरोप केले मात्र अद्याप कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ट्रुडो यांच्यावर मतपेटीच्या राजकारणासाठी केलेला प्रयत्न असा आरोप केला होता. त्यानंतर आता कॅनडाकडून सावध भूमिका घेतली जात असल्याचे दिसत आहे.