नवी दिल्ली : रविवारी कॅनडाच्या ब्रॅम्प्टन शहरात एका हिंदूमंदिरावर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. आता कॅनडाच्या ब्रॅम्प्टन शहरात खलिस्तानवाद्यांनी हिंदूमंदिरांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी कॅनेडियन नॅशनल कौन्सिल ऑफ हिंदूने (CNCH) मोठे पाऊल उचलले आहे.
कॅनेडियन नॅशनल कौन्सिल ऑफ हिंदूने खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात कारवाईची मागणी करणारा मोठा निर्णय घेतला. कॅनडात उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांना हिंदू मंदिरांमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. जोपर्यंत खलिस्तानींवर कारवाई होत नाही आणि मंदिरांची सुरक्षा बळकट केली जात नाही, तोपर्यंत मंदिरांचा राजकीय हेतूने वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
कॅनेडियन नॅशनल कौन्सिल ऑफ हिंदू्सने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये आहे की, आज ब्रॅम्प्टनमधील गोर रोडवर असलेल्या हिंदू मंदिराला हिंसक घटनेदरम्यान खलिस्तान समर्थक आंदोलकांनी लक्ष्य केले. ज्यामुळे कॅनडातील हिंदू समुदायाच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. आंदोलक मंदिराच्या मुख्य गेटवर जमले, बळजबरीने आवारात घुसले आणि मंदिराच्या सदस्यांवर शारीरिक हल्ला केला, ज्यामुळे समुदाय भयभीत झाला आहे.
हिंदू कॅनेडियन लोकांना टारगेट केलं जातंययाचबरोबर, हिंदू कॅनेडियन लोकांना टारगेट करून हा हल्ला करण्यात आल्याचे म्हटले आले. हिंदूंवरील धोकादायक घटनांच्या मालिकेचे हे ताजे उदाहरण आहे. हिंदू धर्मस्थळांच्या संरक्षणासाठी मजबूत सुरक्षा उपायांसाठी समुदाय नेत्यांद्वारे वारंवार आवाहन करूनही, नेत्यांनी वाढत्या शत्रुत्वाचा सामना करण्यासाठी अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत.
नेत्यांना मंदिरात नो-एंट्रीदरम्यान, आजच्या हल्ल्यानंतर कॅनेडियन नॅशनल हिंदू कौन्सिल (CNCH) आणि हिंदू फेडरेशनने मंदिर नेते आणि हिंदू वकील गट यांच्या संगनमताने एक निर्णय घेतल्याचे प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे. त्यानुसार, संपूर्ण कॅनडामधील हिंदू मंदिरे आणि संस्था यापुढे आता राजकारण्यांना मंदिराच्या सुविधांचा राजकीय उद्देश्यांसाठी वापर करू देणार नाहीत. राजकारणी कोणत्याही पक्षाशी संबंधीत असले तरीही ते भक्त म्हणून येऊ शकतात, मात्र जोपर्यंत ते खलिस्तानी अतिरेक्याचा मुद्दा सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न करत नाहीत, तोपर्यंत त्यांना मंदिराच्या व्यासपीठावर प्रवेश मिळणार नाही.
नेमकं काय घडलंय कॅनडामध्ये?कॅनडातील हिंदू सभा मंदिरात रविवारी काही हिंदू भाविकांवर खलिस्तानवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्याचा प्रतिकार हिंदू भाविकांकडून करण्यात आला. त्यानंतर मंदिर परिसरातच तुफान हाणामारी झाली. या घटनेमध्ये काहीजण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, आम्ही मंदिर परिसरात भारतीय उच्चायुक्त दर्शनासाठी येण्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करत होतो, असे म्हणत सिख फॉर जस्टिस या खलिस्तानवादी संघटनेने हा हल्ला केल्याचा दावा फेटाळून लावला आहे.