कॅनडाच्या टोरंटोमधील स्कारबोरो येथे झालेल्या अंदाधुंद गोळीबारात ११ जण जखमी झाले. रात्री १०:३० च्या सुमारास प्रोग्रेस अव्हेन्यू आणि कॉर्पोरेट ड्राइव्हजवळ ही घटना घडली. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेदरम्यान एका पबजवळ अनेक लोकांना गोळ्या लागल्या आहेत.
गोळीबाराच्या घटनेनंतर जखमींच्या प्रकृतीबद्दल नेमकी माहिती मिळालेली नाही. पोलीस आणि आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या आणि परिसर सुरक्षित केला आणि जखमींना मदत केली. या घटनेतील संशयित अजूनही फरार असल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
गोळीबार करणाऱ्याची ओळख, हल्ल्यामागील हेतू किंवा हल्ल्यात वापरण्यात आलेल्या शस्त्राबाबत अद्याप कोणतीही माहिती सार्वजनिक केलेली नाही. परिसरातील रहिवाशांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास ताबडतोब कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांना कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
टोरंटोमधील मार्खममध्ये गोळीबार
टोरंटोमधील मार्खम येथील एका घरात झालेल्या गोळीबारात एका २० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. यॉर्क प्रादेशिक पोलिसांनी सांगितलं की, शुक्रवारी सकाळी ६:३० वाजता हायवे ४८ आणि कॅसलमोर अव्हेन्यूजवळील सोलेस रोडवरील एका घरात गोळीबार झाला. पोलिसांनी सांगितलं की जखमींना ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आलं आणि थोड्या वेळाने मृत घोषित करण्यात आलं.