ओट्टावा : विजेच्या तीव्र टंचाईला तोंड देत असलेल्या भारताला कॅनडा यावर्षीपासूनच पाच वर्षे युरेनियम देणार आहे. कॅनडाचा हा निर्णय दोन देशांतील द्विपक्षीय सहकार्य आणि परस्परांमधील विश्वासाचा नवा अध्याय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. दरम्यान, कौशल्य विकास क्षेत्रात दोन्हीही देशांनी १३ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. पंतप्रधान बुधवारी तीन दिवसीय कॅनडा दौऱ्यानिमित्त येथे दाखल झाले.कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्याशी बुधवारी मोदी यांनी व्यापक चर्चा केल्यानंतर करारावर स्वाक्षरी झाली. तीन हजार मेट्रीक टन युरेनियमसाठी २५४ दशलक्ष अमेरिकन डॉलरचा खर्च येणार आहे. सध्या रशिया आणि कझागस्तानकडून भारताला युरेनिमयमचा पुरवठा होत आहे. युरेनियमचा हा पुरवठा आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेने ठरवून दिलेल्या सुरक्षा माणकांप्रमाणे केला जाईल. भारत आणि कॅनडा यांच्यामध्ये काही दशकांनंतर नागरी अणु उर्जा विभागात व्यावसायिक सहकार्य सुरू होईल, असे मोदी यांनी सांगितले. माझ्या या दौऱ्याचा उपयोग या दोन देशांतील द्विपक्षीय संबंधांची नवी उंची गाठण्यासाठी स्प्रिंगबोर्डसारखा होईल, अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली.या करारानुसार कॅनडाची कंपनी कॅमिको कॉर्प भारतातील अणुभट्ट्यांना इंधनाचा पुरवठा करील. दरम्यान, न्यूयॉर्कमधील मेडीसन चौकातील सभेच्या धर्तीवर कॅनडात टोरोंटो येथे भारतीय नागरिकांची सभा आयोजित करण्यात आली आहे. येथील भारतीय नागरिकांशी पंतप्रधान संवाद साधतील. कॅनडातील एअर इंडियाच्या स्मारकालाही पंतप्रधान भेट देणार आहेत. (वृत्तसंस्था)फ्रान्स, जर्मनी व कॅनडा या तीन देशांच्या दौऱ्यातील पंतप्रधानांचा कॅनडा हा अखेरचा टप्पा आहे. गेल्या ४२ वर्षांत भारत व कॅनडा यांच्यातील परस्पर संबंधामधील हा महत्त्वाचा टप्पा आहे. भारताचे पंतप्रधान प्रथमच कॅनडा भेटीवर आले आहेत. त्यामुळे सर्व वाटाघाटीसाठी विशेष आखणी करावी लागणार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी सांगितले. कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्याशी मोदी यांच्या वाटाघाटी होतील. कॅनडा व भारत यांच्यातील संबंध अधिक दृढ कसे होतील व पुढे कसे नेता येतील याबद्दलही चर्चा होईल. या चर्चेचे निष्कर्ष भरीव असतील असे अपेक्षित आहे. चर्चेत ऊर्जेवर अधिक भर असेल, शिवाय कृषी, कुशल तंत्रज्ञान व शिक्षण याही मुद्यावर बोलणी होतील. भारताच्या विकासासाठी हे सर्व मुद्दे आवश्यक असल्याचे पंतप्रधानांचे मत आहे. सुरक्षा, प्रामुख्याने खुल्या समाजाला असणारे धोके हाही चर्चेचा एक प्रमुख विषय असणार आहे. (वृत्तसंस्था)४फ्रेंच नागरिकांप्रमाणेच भारताने कॅनडासाठी व्हिसाचे उदार धोरण राबविण्याचे जाहीर केले. हे धोरण भारत व कॅनडाच्या नागरिकांमध्ये थेट संपर्क वाढवून व्यापक संबंध निर्माण करील, असे मोदी म्हणाले. फ्रान्सने भारतीय पर्यटकांना ४८ तासांत व्हिसा देण्यात येईल, असे जाहीर केले तर भारताने फ्रेंच पर्यटकांना इलेक्ट्रॉनिक व्हिसा उपलब्ध करून देण्यात येईल.