कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो येत्या निवडणुकीमुळे भारताविरोधात गरळ ओकत आहेत. खलिस्तानी दहशतवाद्यांना खूश करण्यासाठी ट्रुडो भारतीयांना आता नोकरीवरून काढून टाकण्याचे इशारे देत आहेत. अशातच ट्रुडो यांची खुर्ची धोक्यात आली आहे. त्यांच्या पक्षाच्या खासदारांनीच ट्रुडो यांना पुढील निवडणूक न लढविण्याची आणि पदावरून राजीनामा देण्याची मागणी केली आहे.
लिबरल पार्टीच्या खासदारांनी ट्रुडो यांना यावर निर्णय घेण्यासाठी २८ ऑक्टोबरपर्यंतचा वेळ दिला आहे. जर ट्रुडो यांनी या तारखेपर्यंत पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला नाही तर त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असाही काही खासदारांनी इशारा दिला आहे.
ट्रुडो यांची लोकप्रियता घसरत चालली आहे. याचबरोबर त्यांच्या पक्षाचीही लोकप्रियता कमी होत चालली आहे. यामुळे सर्व खासदार चिंतेत आले आहेत. यातून ते ट्रुडो यांच्यावर पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव आणत आहेत. काही दिवसांपूर्वीच ट्रुडो यांनी पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली होती. यात त्यांनी लिबरल पार्टी मजबूत आणि एकत्र आहे असे म्हटले होते. तर जवळपास २० खासदारांनी त्यांना आरसा दाखविला आहे.
या २० खासदारांनी ट्रुडो यांना पत्र लिहून राजीनाम्याची मागणी केली आहे. पुढील निवडणुकीपूर्वी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. खासदार केन मॅकडोनाल्ड यांनी सांगितले की, ''ट्रुडो यांनी आता ऐकायला सुरुवात करावी. लोकांचे म्हणणे ऐकावे. पक्षाची लोकप्रियता घसरत चालल्याने आपण पुढील निवडणूक लढविणार नाही.'' मॅकडोनाल्ड देखील या २० खासदारांमध्ये सहभागी आहेत.
एवढे असूनही ट्रुडो यांनी चौथ्या कार्यकाळासाठी उमेदवारी देणार असल्याचे संकेत दिले आहेत. नुकताच टोरंटो आणि माँट्रिअलमध्ये झालेल्या विशेष निवडणुकात ट्रुडो यांच्या लिबरल पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला होता. यानंतर ट्रुडो यांच्या नेतृत्वाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते. सर्व्हेमध्येही लिबरल पार्टी ही कंझर्व्हेटिव पक्षाच्या मागे आहे.