ओटावा: भारतात श्रीराम नवमीच्या दिवशी काही ठिकाणी झालेल्या हिंसाचारावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच आता कॅनडाील न्यू डेमोक्रेटिक पक्षाचे नेते जगमीत सिंग यांनी भारतातील मोदी सरकारवर निशाणा साधत, मोदी सरकारने मुस्लिमविरोधी भावना भडकावणे बंद करावे, अशी घणाघाती टीका केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून भारतातील घटनांची दखल घेत सिंग यांनी भारत सरकारवर आरोप केले आहेत.
भारतातील मुस्लिम समुदायाविरुद्ध हिंसाचाराच्या घटना, त्याचे फोटो आणि व्हिडिओ पाहून खूप चिंता वाटू लागली आहे. मला भारतातील त्या परिस्थितीची खूप काळजी वाटते आहे. मोदी सरकारने मुस्लिमविरोधी भावना भडकवण्याचे थांबवले पाहिजे. मानवी हक्कांचे संरक्षण केले पाहिजे, असे मोठे आरोप करत, सर्वत्र शांततेच्या दिशेने काम करण्यासाठी कॅनडाने मजबूत भूमिका बजावली पाहिजे, असे जगमीत सिंग यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
अमेरिकेनेही व्यक्त केली चिंता
कॅनडाशिवाय अमेरिकेनेही भारतातील हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री एंटनी ब्लिंकन यांनी भाष्य केले आहे. भारतातील मानवी हक्कांचे उल्लंघन होणाऱ्या घटनांवर आम्ही लक्ष ठेवून असतो. भारतासोबत यासंदर्भात नियमितपणे, सातत्याने चर्चा करत असतो. भारतातील काही राज्य सरकार, पोलीस आणि कारागृह प्रशासनाकडून होणाऱ्या मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांवरही आमचे लक्ष आहे, असे ब्लिंकन यांनी यापूर्वी म्हटले होते.
दरम्यान, कोरोना संकटानंतर देशभरात मोठ्या प्रमाणात राम नवमीचा उत्साह पाहायला मिळाला होता. देशातील अनेकविध ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, काही ठिकाणी या शोभायात्रांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्याचे समोर आले. मध्य प्रदेशात घडलेल्या हिंसाचारात आतापर्यंत १०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.