वाॅशिंग्टन : गेल्या वर्षी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंटांचा सहभाग असल्याच्या आराेपासंदर्भात आपल्याकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता तर केवळ गुप्तचर माहिती होती, अशी कबुली कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दिली आहे.
लोकशाही यंत्रणा व निवडणूक यंत्रणेमध्ये विदेशी शक्तींच्या हस्तक्षेपाबद्दल चौकशी करणाऱ्या समितीसमोर साक्ष देताना ट्रूडो म्हणाले की, कॅनडात झालेला हिंसाचार कोणा व्यक्तीने घडविला की एखाद्या देशाच्या सरकारमधील उच्चपदस्थ व्यक्तीने तसे आदेश दिले होते हे शोधण्याकरिता आम्ही भारताची मदत घेत आहोत. हिंसाचार, दहशतवादी कृत्य, द्वेष या गोष्टींना चिथावणी देण्याच्या गुन्ह्यांची कॅनडा गंभीर दखल घेत नाही, असे भारताचे मत आहे, असेही ट्रुडो म्हणाले.
ट्रूडो सरकारने यापूर्वी निज्जर हत्याकांडाशी संबंधित पुरावे भारताला दिल्याचा दावा केला होता. मात्र, कॅनडाने कोणतेही पुरावे दिले नसल्याचे भारताच्या म्हणण्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.