वॉशिंग्टन : धूम्रपान, मद्यपान व अधिक प्रमाणातील बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) ही तीन प्रमुख कारणे व अन्य गोष्टींमुळे कर्करोग होऊन जगामध्ये २०१९ साली ४४.५ लाख लोकांचा मृत्यू झाला. यासंदर्भातील एका अभ्यासाचे निष्कर्ष ‘लॅन्सेट जर्नल’ या नियतकालिकात शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आले.
कर्करोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी या अभ्यासाच्या निष्कर्षांचा धोरणकर्त्यांना मोठा उपयोग होईल असे लॅन्सेट जर्नलने म्हटले आहे. वाॅशिंग्टन विद्यापीठातील इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन (आयएचएमई) या संस्थेचे संचालक ख्रिस्तोफर मरे यांनी सांगितले की, सार्वजनिक आरोग्याला कर्करोगाचा मोठा धोका आहे. जगामध्ये या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण लक्षणीय आहे. कर्करोग होण्यामागे धूम्रपान हे सर्वांत प्रमुख कारण आहे. त्यानंतर अन्य कारणांचा क्रम लागतो.
२०१९ साली जगामध्ये कोणत्या आजारांमुळे, अपघात किंवा अन्य कारणांमुळे जखमी झाल्याने किती मृत्यू झाले याची जागतिक स्तरावरील आकडेवारी उपलब्ध आहे. लोकांना २३ विविध प्रकारचे कर्करोग होण्यासाठी जबाबदार असणाऱ्या चयापचय, पर्यावरणविषयक, तसेच व्यसनांबाबतच्या ३४ कारणांचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. २०१० ते २०१९ या कालावधीत कर्करोग रुग्णांचे प्रमाणही तपासण्यात आले.
तंबाखू, मद्य यांचे व्यसन, असुरक्षित लैंगिक संबंध, आहारातील असमतोलपणा या कारणांमुळेही कर्करोग होण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यातील काही कारणांमुळे २०१९ साली २८.८ लाख पुरुषांचा, तर १५.८ लाख महिलांचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. श्वसननलिका, फुप्फुसाचा कर्करोग यामुळे पुरुष व महिलांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. (वृत्तसंस्था)
पाच भागांमध्ये कर्कग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक
पाच प्रदेशांमध्ये कर्करोग रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. या मृत्यूंचे प्रमाण दर एक लाख लोकसंख्येमागे याप्रमाणे आहे.