ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 22 - लंडनमध्ये राहणा-या 20 वर्षीय एलिस हिला जेव्हा आपण गर्भवती असल्याचं कळालं तेव्हा तिला आकाश ठेंगणं वाटतं होतं. पण एलिसला माहित नव्हतं की तिच्या पोटात एक बाळ जन्म घेत नसून, कॅन्सर ट्यूमर वाढत आहे.
सर्व चाचण्या पॉझिटिव्ह आल्यानंतर एलिस आणि तिच्या बॉयफ्रेंडने घरात येणा-या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी सगळी तयारी सुरु केली होती. स्वप्नांच्या दुनियेत त्यांनी आपलं नवं आयुष्य आखायला सुरुवात केली होती. दिवस जवळ येत असल्याने बाळाचं नाव काय ठेवायचं हेदेखील पाहून ठेवलं होतं.
मात्र अचानक एलिसला रक्तस्त्रावाची समस्या जाणवू लागल्याने लंडनमधील हेअरफोर्ड रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी एलिसचा गर्भपात झालं असल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे त्यावेळी गर्भवती चाचण्या पॉझिटिव्ह आल्या.
खरंतर एलिसच्या गर्भात एक बाळ नाही, तर कॅन्सर ट्यूमर वाढत होता. एका बाळाप्रमाणे त्याची वाढ होत होती, त्यामुळेच गर्भवती चाचण्या पॉझिटिव्ह येत होत्या. याचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा डॉक्टरांनी गर्भपात झाला असल्याचं सांगत एलिसला आराम करण्यासाठी घरी पाठवलं. पण काही दिवसांनी पुन्हा रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता, एलिसच्या गर्भात ट्यूमर (Gestational Tropho-Blastic Neoplasia) असल्याचं उघड झालं.
यानंतर डॉक्टरांनी तात्काळ एलिसवर कॅन्सरच्या उपचारांनी सुरुवात केली. एलिसला केमोथेरपी देण्यात आली. पण त्यानंतरही परिस्थिती बिघडल्याने एलिसचं ऑपरेशन करण्यात आलं. ऑपरेशन करुन एलिसच्या पोटातून जवळजवळ एक पाऊंड वजनाचा ट्यूमर काढण्यात आला.