गुदाशयाचा कर्करोग असलेल्या रुग्णांच्या एका छोट्या पथकानं नुकताच एक चमत्कार अनुभवला कारण त्यांचा कर्करोग प्रायोगिक उपचारानंतर नाहीसा झाला आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या म्हणण्यानुसार, एका अत्यंत लहान क्लिनिकल चाचणीमध्ये १८ रुग्णांनी डॉस्टारलिमॅब (Dostarlimab) नावाचे औषध सुमारे सहा महिनं घेतलं आणि शेवटी त्यांच्यापैकी प्रत्येकाचा ट्यूमर नाहीसा झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
डॉस्टारलिमॅब हे प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेलं असं औषध आहे जे मानवी शरीरात पर्यायी प्रतिपिंड म्हणून काम करतं. गुदाशयाचा कर्करोग असलेल्या सर्व रुग्णांना समप्रमाणात हे औषध देण्यात आलं होतं. परिणामी प्रत्येक रुग्णातील कर्करोग पूर्णपणे नष्ट झाल्याचं समोर आलं आहे. संबंधित रुग्णांची शारीरीक तपासणी केली. एंडोस्कोपी, पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी किंवा पीईटी स्कॅन तसंच एमआरआय स्कॅन करुनही कर्करोगाची कोणतीही लक्षणं संबंधित रुग्णांमध्ये आढळली नाहीत. "कर्करोगावरील उपचारांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं आहे", असं न्यूयॉर्कच्या मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरचे डॉ. लुईस ए. डायझ जे. म्हणाले.
न्यूयॉर्क टाईम्सच्या माहितीनुसार, क्लिनिकल ट्रायलमध्ये सामील असलेल्या रुग्णांना त्यांच्या कर्करोगाचा नाश करण्यासाठी मागील उपचारांचा सामना करावा लागला, जसं की केमोथेरपी, रेडिएशन आणि आक्रमक शस्त्रक्रिया ज्यामुळे आतडी, मूत्र आणि लैंगिक समस्या देखील निर्माण होऊ शकतात. आपल्यालाही यातून जावं लागेल म्हणून १८ रुग्णांनी एक पाऊल पुढे टाकत पुढील चाचणीचा सामना करण्याची तयारी दाखवली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पुढील उपचारांची आवश्यकताच आता भासणार नाही. या निष्कर्षामुळे आता वैद्यकीय जगतात खळबळ उडाली आहे. प्रत्येक रुग्णात कर्करोग पूर्णपणे नाहीसा झाला हे याआधी असं कधीच आढळून आलेलं नव्हतं, असं कॅलिफोर्निया विद्यापीठातील कोलोरेक्टल कॅन्सर तज्ज्ञ डॉ. अॅलन पी. वेनूक म्हणाले. या संशोधनाचे त्यांनी जागतिक स्तरावर कौतुक केलं.
मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर आणि पेपरच्या सह-लेखिका, ऑन्कोलॉजिस्ट डॉ आंद्रिया सेरसेक यांनी १८ रुग्ण पूर्णपणे कॅन्सरमुक्त झाल्याच्या क्षणाचं वर्णन "आमच्या डोळ्यात आनंदाश्रू होते", असं केलं. चाचणीमध्ये रुग्णांनी सहा महिन्यांसाठी दर तीन आठवड्यांनी डॉस्टारलिमॅब घेतलं. ते सर्व त्यांच्या कर्करोगाच्या समान अवस्थेत होते. स्थानिक पातळीवर या रुग्णांच्या गुदाशयात कर्करोग झाला होता परंतु इतर अवयवांमध्ये पसरला नव्हता.
आता, ज्या कर्करोग संशोधकांनी औषधाचे पुनरावलोकन केलं त्यांनी सांगितले की, हे उपचार आशादायक दिसत आहेत, परंतु अधिक रुग्णांसाठी ते कार्य करेल की नाही आणि कर्करोग खरोखरच पूर्णपणे बरा होत आहे का हे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचणी होणं आवश्यक आहे.